नगर ः प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी वेगाने काम करण्यासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी ओळखले जातात. सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून गडकरींचे नेहमीच कौतुक होत असते. नगरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील गडकरी यांचे विशेष कौतुक केले.
नगरमध्ये शनिवारी (दि. 2) महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात नितीन गडकरी आणि शरद पवार एका व्यासपीठावर आले. त्या वेळी पवारांनी गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाल्याचे नमूद केले.
या वेळी बोलताना पवार यांनी रस्त्याची वाहतूक समाजाच्या व्यापक हितासाठी महत्त्वाची असते, असे सांगतानाच यात गडकरींचा मोलाचा वाटा असल्याचे म्हटले. गडकरींनी ही जबाबदारी घेण्याच्या पूर्वी देशात पाच हजार किमीचे काम झाले होते. गडकरींकडे जबाबदारी आल्यानंतर तोच आकडा 12 हजार किमींच्या पुढे गेला आहे, असे पवार म्हणाले.
देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकार्यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात ‘ही गडकरी साहेबांची कृपा आहे’. लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो याचे उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवले आहे, असे पवार यांनी सांगितले.
संसदेत मी बघतो की गडकरींकडे येणार्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा पक्ष ते बघत नाहीत, तर त्याने आणलेले विकासकाम काय आहे हे ते पाहतात. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो, असेही पवार म्हणाले.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper