पुणे : प्रतिनिधी
शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी (दि. 15) पहाटे 5च्या सुमारास निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहचविले. राजा शिवछत्रपती या ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली. त्याचप्रमाणे जाणता राजा या महानाट्याचे लेखन व दिग्दर्शन केले होते. 29 जुलै 2021 रोजी त्यांचा 100वा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्व क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांना व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.
बाबासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात आले होते, तर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिवप्रेमी उपस्थित होते.
बाबासाहेबांचे कार्य सदैव स्मरणात राहील -पंतप्रधान मोदी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून बाबासाहेबांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्वीट करीत मराठीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृतीच्या विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखद प्रसंगी मी त्यांचे कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मराठी भाषेत आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणार्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले आहे. बाबासाहेब उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तित्व होते. त्यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारणे व शिवरायांचा इतिहास सर्वदूर पोहचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
-भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र