Breaking News

समाजाची मुलींविषयीची मानसिकता बदलली पाहिजे -पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे

मुरूड : प्रतिनिधी

एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानात क्रांती होताना दिसत आहे, मात्र मुली-महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीत. समाजाने मुली-महिलांविषयीची मानसिकता बदलली तरच त्या सुरक्षित राहू शकतील, असे प्रतिपादन मुरूडच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे यांनी येथे केले.

मुरूडमधील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे बोलत होत्या. मुलींनी सावधगिरी बाळगून सक्षम राहिले पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

आजकाल सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी मुलींनी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप हाताळताना, आपले फोटो दुसर्‍याला शेअर करताना विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे, असे रेखा जगदाळे म्हणाल्या.

स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा यांची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. प्रत्येक कार्यशेत्रात महिला अग्रेसर आहेत. त्यांनी पुढे येऊन अत्याचाराच्या विरोधात लढा उभारला पाहिजे, असे  डॉ. सीमा नाहिद यांनी सांगितले. महाविद्यालय विकास समितीच्या वासंती उमरोटकर, प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुभाष म्हात्रे यांनी केले. पोलीस शिपाई प्रीती वारिक, पोलीस नाईक सुरेश वाघमारे यांच्यासह प्राध्यापक या वेळी उपस्थित होते.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply