उरण : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि. 20) संत शिरोमणी गाडगे महाराजांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यासोबत राष्ट्रीय गणितोत्सव साजरा करण्यात आला. विद्यालयाचे चेअरमन कृष्णा कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, एस. जी. म्हात्रे, सांस्कृतिक विभागप्रमुख एच. एन. पाटील, दर्शना माळी, व्ही. डी. पाटील यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयात राष्ट्रीय गणितोत्सव ही अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. गणित विषय प्रमुख साधना पाटील, एस. एस. घोडके, आर. एन. पाटील, सुहास नाईक यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय गणितोत्सवाची माहिती सांगितली. राष्ट्रीय गणितोत्सवानिमित्ताने विद्यालयात रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पना स्पष्ट करणार्या सुंदर रांगोळ्या, तसेच चित्रांचे रेखाटन केले. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गाशिक्षकांनी आपापल्या वर्गात गाडगेबाबांच्या कार्याची माहिती सांगितली. संत गाडगेबाबांची स्वच्छतेची शिकवण लक्षात घेत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली. शेवटी रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper