Breaking News

26 डिसेंबर वीर बाल दिवस म्हणून होणार सर्वत्र साजरा; पंतप्रधान मोदींची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 9) गुरू गोविंदसिंग यांची जयंती अर्थात गुरू पर्वानिमित्त मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाकडे गुरू गोविंदसिंग यांच्या चार पुत्रांना श्रद्धांजली म्हणून पाहिले जात आहे.पंतप्रधान मोदींनी या पार्श्वभूमीवर रविवारी ट्वीट करीत म्हटले की, गुरू गोविंदसिंग यांची जयंती म्हणजेच प्रकाश पर्वानिमित्त मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे, आता भारत दरवर्षी 26 डिसेंबरला वीर बाल दिन साजरा करेल. गुरू गोविंदसिंग यांच्या चार पुत्रांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल. पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले, वीर बाल दिन, हा तोच दिवस आहे, ज्या दिवशी साहिबजादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांनी या देशासाठी बलिदान दिले आणि त्यांना भिंतीत जिवंत चिनून मारण्यात आले होते. या दोन महान व्यक्तींनी इतर कोणताही धर्म स्वीकारण्याऐवजी मृत्यू स्वीकारला होता. माता गुजरीदेवी, श्री गुरू गोविंदसिंग आणि त्यांच्या चार साहिबजाद्यांचे शौर्य भारतातील कोट्यवधी लोकांना धैर्य देते. ही थोर माणसे अन्यायापुढे कधी झुकली नाहीत. आता लोकांनी त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Leave a Reply