मोहोपाडा : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) होणारे मतदान शांततेत पार पडावे आणि मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खालापूर तालुक्याचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या नेतृत्वाखाली एकूण 160 पोलीस कर्मचार्यांनी चांभार्ली,
मोहोपाडा बाजारपेठेतून वावेघर असा रुट मार्च केला.
मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी वातावरण उत्साही करण्यासाठी पोलिसांकडून चांभार्ली ते नवीन पोसरी-मोहोपाडा बाजारपेठेतून वावेघर असे पथसंचलन करण्यात आले. या वेळी पथसंचलनात 1 डीवायएसपी, 1 एपीआय, 2 पीआय, 4 पीएसआय, 60 पोलीस कर्मचारी, 30 होमगार्ड्स, 30 सीआयसीएफ, 30 आरसीबी जवान सामील होते. यासाठी रसायनीत चार सेक्टर
नेमण्यात आले असून पोलीस कर्मचारी संपूर्ण सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करणार आहेत. हे सशस्त्र संचलन पाहून रसायनीतील मतदारमतदानाच्या दिवशी जास्त संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर पडतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.पोलीस दल मतदारांच्या सुरक्षेसाठी सक्षम असल्याचे या वेळी दिसले.
RamPrahar – The Panvel Daily Paper