कर्नाळा बँकेच्या केवायसी न केलेल्या ठेवीदारांना आवाहन

पनवेल : प्रतिनिधी
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 543 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यापैकी पाच लाखापर्यंत रक्कम असलेल्या ठेवीदारांच्या 374 कोटी रुपयांचे वाटप करण्यास सुरुवात झाली असून ज्या ठेवीदारांनी आतापर्यंत केवायसी केली नाही किवा त्यांचे दुसर्‍या बँकेतील खाते नंबर दिला नाही, त्यांनी पैसे मिळण्यासाठी त्याची लवकरात लवकर पूर्तता करावी, असे आवाहन कर्नाळा बँक अवसायक ए. आर. हांडे यांनी केले आहे.
अवसायक हांडे यांनी पैसे वाटप लवकर व्हावे यासाठी केलेल्या व्यवस्थेची माहिती देताना सांगितले की, आम्ही वेगवेगळ्या टीम केल्या आहेत. ठेवीदारांनी दिलेले केवायसी कागपत्र व दुसर्‍या बँकेतील खाते क्रमांक बरोबर आहेत की नाहीत याची तपासणी करतो. प्रकरण मंजूर होऊन आले असले तरी कोणाला कमी-जास्त जाऊ नयेत
यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत.
पैसे वाटप करताना आम्ही अल्फाबेटिकल सिक्वेन्सने जातो. त्यामुळे जास्त वेळ जात नाही. यामध्ये ज्यांनी आमच्याकडे त्यांचे फोन नंबर दिलेत त्यांना फोन लावून बोलावून घेतो. रोज साधारण 250-300 लोकांना बोलवतो. त्यांची तपासणी करायला 10 काऊंटर आहेत. त्यांचा बँक खाते नंबर व सगळे पेपर तपासतो. एका माणसाची सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण 15-20 मिनिटे लागतात. ज्यांना बोलावले आहे त्यांचेच पेपर घेऊन काम करतो. त्यामुळे पेपर शोधण्यात वेळ जात नाही. एखादा दुसर्‍या दिवशी आला तरी घेतो, पण त्याला थोडे थांबायला लागते. आम्ही लोकांना फोन लावून चार दिवसांनी बोलवतो. तरी अनेक जण येत नाहीत, असा आमचा अनुभव आहे. एखाद वेळेस त्यांना कामातून सुटी मिळत नसेल, पण सगळ्यांची सोय पाहणे आम्हालाही शक्य नाही.
ज्या ठेवीदारांनी आतापर्यंत केवायसी केली नाही किवा त्यांचे दुसर्‍या बँकेतील खाते नंबर दिला नाही, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र केवायसी काऊंटर ठेवला आहे. तेथे बँकेच्या वेळात केव्हाही येऊन पेपर देऊ शकतात. त्यांनी पेपर जमा केले तरच आम्हाला त्यांना बोलावून पैसे देता येतील. यासाठी अशा ठेवीदारांनी लवकरात लवकर आपले पेपर जमा करावेत; अन्यथा त्यांना आम्हाला शोधत बसावे लागेल. आम्हाला चार महिन्यांत हे काम पूर्ण करायचे आहे, असे अवसायक हांडे यांनी या वेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आमच्या सगळ्या शाखेतील ठेवीदारांचे पैसे आम्ही सध्या इथेच देतो. महाडवाल्यांची मागणी आहे, पण आमच्याकडे तेवढे प्रशिक्षित कर्मचारी व आवश्यक इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांनी इथे येऊन फॉर्म भरल्यास बरे होईल, पण अगदीच ज्यांना शक्य होणार नाही त्यांना शेवटी आम्ही तेथे जाऊन देऊ. आमचे हे काम चार महिने चालणार आहे.
या वेळी अवसायक हांडे यांनी ठेवीदारांना तत्काळ पैसे मिळावेत म्हणून हे डीआयजीसीने पैसे दिले आहेत. त्यामुळे आमच्यावर (अवसायकवर) कर्जदारांकडून पैसे वसूल करणे आणि जप्त केलेल्या प्रॉपर्टी विकून मिळालेले पैसे हे पुन्हा डीआयजीसीला परत करण्याची जबाबदारी असल्याचेही सांगितले.
कागदपत्रांची पूर्तता करावी
ज्या ठेवीदारांनी त्यांचे केवायसी कागदपत्रे सादर केली नाहीत त्यांनी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कार्यालयात आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, फोटो व अन्य बँकेतील खात्याचा कॅन्सल चेक लवकरात लवकर पनवेल शहरातील टपाल नाका येथील शाखेत जमा करावा. पहिल्या टप्प्यातील वाटप पूर्ण झाल्यावर आता कागदपत्रे देणार्‍यांना क्लेम मंजुरी, नंतर यादीतील क्रमाने किमान आठ दिवस अगोदर फोन करून दिवस व वेळ कळविण्यात येईल. तेव्हा ओळखपत्रासह यावे. त्या वेळी ठेवींच्या मूळ पावत्या व पासबूक बँकेत जमा करून पोहोच दिली जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करून दोन-तीन दिवसांत संबंधित बँकेस ठेवीदारच्या खात्यात मंजूर रक्कम जमा करण्याची सूचना पाठवण्यात येईल. ठेवीदाराने स्वत: उपस्थित राहावे. एजंट किवा बाहेरील व्यक्तीमार्फत संपर्क करू नये, असे कळविण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून दिलासा
कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट गॅरंटीकडून पाच लाखापर्यंतच्या ठेवींची रक्कम देण्यात येणार आहे. ठेव विमा व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक विशेष विभाग आहे जो केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. 15 जुलै 1978 रोजी ठेव विमा व क्रेडिट हमी कॉर्पोरेशन कायदा 1961 अंतर्गत ठेवींचा विमा व क्रेडिट सुविधांची हमी देण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली. विद्यमान केंद्र सरकारने त्यात बदल करून बँक अवसायनात निघल्यास 90 दिवसांत पैसे देण्याची तरतूद केल्याने हे पैसे मिळत आहेत.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply