Breaking News

मराठी भाषेचा वारसा जपा -प्राचार्य इंदुमती घरत

सीकेटी विद्यालय व कोमसापतर्फे मराठी भाषा दिन साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

मराठी भाषा गोड आहे. तिची भुरळ अनेक अमराठी माणसांनाही पडली आहे. त्यामुळे आपल्या मातृभाषेचा वारसा आपण जपला पाहिजे, असे मत चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य इंदुमती घरत यांनी शनिवारी (दि. 26) नवीन पनवेल येथे सोहळ्यात व्यक्त केले.

नवीन पनवेल येथील सीकेटी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन कोमसापच्या नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. सुप्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रज यांची प्रतिमा आणि त्यांच्या पुस्तकांचे पालखीत पूजन केल्यानंतर शाळेच्या मुख्य द्वारापासून पालखी काढण्यात आली. या पालखीबरोबर शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेषभूषेत सहभागी झाले होते.

कोमसाप नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी आपल्या भाषणात, प्रत्येकाला मातृभाषेचा अभिमान आहे. ही मातृभाषा लोप पावू नये म्हणून तिचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून केली तर तिचा विस्तार होईल. देशातील अनेक राज्यांमध्ये त्यांच्या असणार्‍या मातृभाषेला मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही मराठी भाषेला महत्त्व दिले गेले पाहिजे, असे सांगितले.

या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख आणि संस्थेचे सचिव डॉ. एस. टी गडदे यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ज्येष्ठ गझलकार ज्योत्स्ना राजपूत, सुनिता रामचंद्र, स्मिता गांधी, रामदास गायधने, गणेश म्हात्रे, योगिनी वैदू, रमेश भोळे, सुमंत नलावडे, चित्रलेखा जाधव, विलास पुंडले, अनिल दाभाडे तसेच सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे, पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका संध्या अय्यर, पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, अजित सोनवणे प्रशांत मोरे,अनुराधा कोल्हे उपस्थित होते.

या वेळी विज्ञान रांगोळी प्रदर्शनाचे तसेच ज्युनियर कॉलेजच्या भित्तीपत्रिकचे उद्घाटन आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनावरील हस्तलिखित पुस्तिकेचे प्रकाशन गणेश कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुरुवातीला मराठी भाषा दिनानिमित्त श्रावणी हजारे हिने  गीत गायले तसेच वेदांत शिंदे याने भाषण केले. सूत्रसंचालन स्वाती पाटील, सारिका दिवेकर,सुवर्णा शिर्के यांनी केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply