नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) त्यांच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासीयांना संबोधित केले. या वेळी त्यांनी सोशल मीडिया स्टार टांझानियाच्या किली पॉल आणि निमा पॉल या भावंडांचा उल्लेख केला. जर टांझानियात भारताची गाणी अशा प्रकारे लिप सिंक करू शकतात, तर माझ्या देशात अनेक भाषांमध्ये असंख्य प्रकारची गाणी आहेत. गुजराती मुले तमिळ गाण्यांवर व्हिडिओ बनवू शकतात. केरळची मुले आसामी गाण्यावर, तर कन्नडच्या मुलांनी जम्मू-काश्मीरच्या गाण्यांवर व्हिडीओ बनवावे. यातून ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ अनुभवता येईल असे वातावरण आपण निर्माण करू शकतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी टांझानियातील दोन्ही भावा-बहिणींचे कौतुक केले. ते म्हणाले, भारतीय संस्कृती आणि माझ्या परंपरेबद्दल बोलताना, आज मला तुमची दोन लोकांशी ओळख करून द्यायची आहे. आजकाल टांझानियन भावंडे किली पॉल आणि निमा पॉल सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. तुम्हीही त्यांच्याबद्दल ऐकले असेल. मी या भाऊ आणि बहिणीचे त्यांच्या अद्भूत सर्जनशीलतेबद्दल मनापासून कौतुक करतो. काही दिवसांपूर्वी भारतीय दूतावासानेही टांझानियाच्या या भाऊ-बहिणीचा गौरव केला होता. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, आम्ही स्वातंत्र्याचा अमृतोत्सव नव्या पद्धतीने साजरा करू शकतो. मी तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी यावे आणि भारतीय भाषांमधील लोकप्रिय गाण्यांचे त्यांच्या पद्धतीने व्हिडीओ बनवावे. तुम्ही खूप लोकप्रिय व्हाल. यामुळे देशातील विविधतेची ओळख नव्या पिढीला होईल.
पनवेल ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधतात. भाजपच्या शहर व तालुका मध्यवर्ती कार्यालयात या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल यांच्यासह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पनवेल ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम रविवारी झाला. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा कार्यक्रम कामोठे मंडल कार्यालयाच्या सभागृहात टीव्हीवर अनुभवला. सोबत शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, शक्तीकेंद्र प्रमुख प्रदीप भगत, बूथ अध्यक्ष अजय मोरे, युवा नेते हॅप्पी सिंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
पंतप्रधानांकडून मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये मराठी भाषा गौरव दिनावर बोलताना सर्व मराठी नागरिकांना खास शुभेच्छा दिल्या. ‘सर्व मराठी बंधू-भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या.