राज्याच्या अर्थसंकल्पावरून माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांची टीका
पनवेल : वार्ताहर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, परंतु शेतकर्यांसाठी त्याच त्याच योजना नाव बदलुन पुन्हा पुन्हा समोर येत असून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका असे माजी राज्यमंत्री तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. ते पनवेल तालुक्यातील बेलपाडा येथे श्री क्षेत्र वल्डेश्वर मंदिराच्या कलशपूजनाच्या कार्यक्रमच्या वेळी बोलत होते.
तुपकर या वेळी म्हणाले की, हेडलाईन मॅनेजमेंटचा हा सगळा प्रकार असुन पेपरला मोठी बातमी देऊन ऐवढे दिले तेवढे दिले याबद्दल भरभरून सांगायचे, मात्र राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाचे पाचे किंवा 10 वर्षांचे ऑडिट केले तर केलेल्या घोषणा आणि झालेली अंमलबजावणी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे घोषणा या फक्त घोषणा राहतात. सामान्य माणसाला याचा काही फायदा होत नाही. हजारो शेतकरी महिन्याला आत्महत्या करत आहेत त्याबद्दल काहीही चर्चा नाही. सामान्य माणसाचे जगणे कसे सुखकर होईल यादृष्टीने या अर्थसंकल्पात फारशी तरतूद केलेली नाही, असे तुपकर यांनी सांगितले.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू, मुख्याध्यापक दत्ता कोळी, नीलम मधुकर कडू, सुजय कडू, मानव कडू आदी उपस्थित होते.
तुपकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बाजुला राहिले आहेत. शेतकरी-कष्टकरी आत्महत्या करतोय, मजुर आत्महत्या करतोय, शेतकर्यांची मुले आत्महत्या करत आहेत.
ग्रामीण भाग उध्वस्त झालाय. सामान्य माणसाला जगणं मुश्किल झाले आहे. व्यापारी उद्योजक कोरोनाच्या काळात अडचणीत आहेत. या सर्व प्रश्नांवर सत्ताधार्यांमध्ये कुठेच चर्चा होताना दिसत नाही.
सगळ्या प्रस्थापित पक्षांनी चिंतन करावे. अन्यथा पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा लोकांनी पर्याय म्हणुन स्वीकार केला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनता सत्ताधार्यांना बाजुला ठेवून सक्षम पक्षाचा स्वीकारतील. त्यामुळे प्रस्थापितांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे, असे मतदेखील तुपकर यांनी व्यक्त केले.