पनवेल : बातमीदार
तालुक्यातील गाढी नदी कचर्याच्या समस्येमुळे प्रदूषित झाली आहे. ठिकठिकाणी नदीत टाकत असलेल्या कचर्यामुळे गाढी नदी कचरामय झाली आहे. गाढी नदीच्या परिसरात निसर्ग मित्र संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी (ता. 1) चिपळे पुलाखालील मोठ्या प्रमाणातील कचरा काढून टाकण्यात आला. पनवेल तालुक्यात नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ठिकठिकाणचा कचरा गाढी नदीत टाकला जात आहे. ऐश्वर्यसंपन्न असणार्या गाढी नदीचे रूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. चिपळे येथील ब्रिजखाली निर्माल्य, प्लॅस्टिक पिशव्या, जलपर्णी, दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या यांचा खच पडलेला दिसत आहे. कचरा कुजल्यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. सोसायट्यांचे सांडपाणी देखील गाढी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे गाढी नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दवाखान्यातील कचरा, इंजेक्शन्स, औषधांच्या बाटल्या, मलमपट्टी, गोळ्यांचे खोके आदी सर्व टाकाऊ (मेडिकल वेस्टेज मटेरियल) पदार्थ गाढी नदी परिसरात टाकलेले आहे. या गाढी नदीच्या परिसरात पनवेल येथील निसर्ग मित्र संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गुढीपाडव्यापासून याला सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संघटनेचे चाळीसहून अधिक सभासद एकत्र येऊन चिपळे पुलाखाली स्वच्छता मोहीम राबवत होते. पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. 25 ते 30 गाड्या भरून येथील कचरा काढला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिली, तर या वेळी मद्याच्या बाटल्या, बायोमेडिकल वेस्टेज देखील काढून टाकण्यात आले. निसर्ग मित्र संघटनेला चिपळे व आकुर्ली ग्रामपंचायतीतर्फे कचरा वाहून नेण्यासाठी घंटगाडीची मदत करण्यात आली. पावसाळा सुरू होईपर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरू राहणार असून या गाढी नदीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात गाढी नदी कशी दिसते व पावसाळ्यानंतर गाढी नदीची कशी दुर्दशा होते याचे चित्रीकरण करून ते संबंधित प्रशासनाला दाखविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी बोलताना सांगितले व नागरिकांमध्ये गाढी नदीबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.