Breaking News

नवी मुंबई लवकरच ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत

आठ महिन्यांत सर्वत्र कॅमेरे; कंपनीकडून कामाला सुरुवात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महापालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून पुढील आठ महिन्यांत संपूर्ण शहर 1500 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या नजरेत येणार आहे. या कामी आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रयत्न केले होते.

सीसीटीव्हीच्या 154 कोटींच्या कामासाठी 274 कोटींची निविदा आधी आली होती. त्यामुळे पालिका आयुक्तांनी ती निविदा प्रक्रियाच रद्द करून नव्याने या कामासाठी निविदा मागवली. त्यामध्ये वजा 7.04 कमी दराने निविदा स्वीकृती केल्यामुळे पालिकेचा अंदाजे 20 कोटींचा फायदा होणार आहे. संबंधित ठेकेदाराला नऊ महिन्यांची कामाची मुदत देण्यात आली असून 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

मेसर्स टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पोलिसांसमवेत साइड सर्व्हे सुरू केल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. त्याचबरोबर हीच कंपनी पुढील पाच वर्षे या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या देखभाल दुरुस्तीचेही काम केले जाणार आहे. सध्या शहरातील 282 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, परंतु शहरातील सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी 150 कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक पद्धतीने शहर तिसर्‍या डोळ्याच्या नजरेत आणणार असून त्यासाठीची सुरुवात झाली आहे.

नागरिकांच्या  सुरक्षिततेच्या दृष्टीने  महापालिका व्याप्त हद्दीतील महत्त्वाची निवडक ठिकाणे, नवी मुंबई शहरातील प्रवेशद्वारे, मुख्य चौक, मार्केट, बस डेपो, रेल्वे स्थानकांबाहेरील परिसर तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी देखरेखीसाठी शहरातील मुख्य रस्ते या ठिकाणी पालिकेने 2012 रोजी 282 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, परंतु आयटी उपकरणे यांचे आयुर्मान पाच वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात 1500 अत्याधुनिक नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

याबाबतचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून लालफितीत व दरांवरून अडखळत पडला होता. नवी मुंबई शहरात प्रवेश करण्यात येणार्‍या ऐरोली मुलुंड उड्डाणपूल, ठाणे दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका, बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्वच प्रवेशद्वारांवर तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या कामांत शहराच्या प्रत्येक प्रवेश निर्गमन जागेवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच शहरात येणार्‍या वाहनाबाबतची माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने नंबर प्लेट वाचण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच शहरातील 27 मुख्य चौकांसाठी 108 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व बस डेपो, मार्केट, उद्याने, मैदाने, पालिका कार्यालये, वर्दळीची ठिकाणे, चौक, नाके, मर्मस्थळे ही सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या कक्षेत येणार आहेत.

शहरातील वर्दळीचे पामबीच मार्ग, ठाणे बेलापूर रोड, पालिका हद्दीतील सायन-पनवेल महामार्ग येथे हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील 43 ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉलबॉक्सची सोय असणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मागणीनुसार देशविघातक व घातपात कृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी खाडी व समुद्रकिनारे अशा नऊ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आठ ठिकाणी स्थानिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत तसेच नवी मुंबई महापालिका मुख्यालय केंद्रीय नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे. या कामाचे डेटा सेंटर पोलीस मुख्यालय असेल तसेच ते पालिकेकडेही स्थापित करण्यात येणार आहे.

वाहनचालकांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी 96 कॅमेरे

रेड लाइट व्हायलेन्सन म्हणजेच सिग्नल तोडणार्‍या वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी देखरेखीसाठी 96 कॅमेरे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनाही वाहतूक नियमांच्या शिस्तीचे पालन करावे लागणार आहेत.

या कामासाठीचा कार्यादेश दिला असून पुढील नऊ महिन्यांत संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार असून सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण काम होणार आहे. तसेच 154 कोटींच्या कामासाठी 274 कोटींपर्यंत निविदा आल्याने ती निविदा प्रक्रियाच रद्द केली. नव्याने दिलेल्या कामात 127 कोटींत काम होणार असून पालिकेचे कित्येक कोटींची बचत होणार आहे.  -अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply