खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
अलिबाग येथे बैलगाडी शर्यतीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच खालापूर तालुक्यात वडवळ येथेही बैलगाडा शर्यतीला गालबोट लागून एका महिलेचा मृत्यू, तर दुसरी महिला जखमी झाली आहे.
वडवळ येथे आई जानाई महाकाली देवी प्रसन्न शर्यत ग्रुपने बैलगाडी शर्यतीचे आयोजन बुधवारी (दि. 22) केले होते, मात्र यासाठी आवश्यक परवानगी आयोजकांनी घेतली नव्हती. शर्यत सुरू असताना एका उधळलेल्या गाडीची धडक कलिंगड विक्रेत्या अनिता बाळाराम गायकवाड (वय 58, रा. नारंगी, खालापूर) तसेच लीलाबाई राजाराम मोरे (रा. वडवळ, खालापूर) यांना बसली. जिव्हारी धडक बसल्याने अनिता गायकवाड यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले तसेच अनोळखी बैलगाडी चालकाने गाडी हयगयीने व निष्काळजीपणे चालविल्याने दुर्घटना घडल्यामुळे खालापूर पोलीस ठाण्यात आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Check Also
नमो चषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत शानदार सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्तशिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाची अशी …