Breaking News

रोह्यात काळा, लाल भाताचे प्रयोग यशस्वी

खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले

रोहे : प्रतिनिधी

नवे तंत्रज्ञान,समाधानकारक पाऊस, शेतीतील प्रयोग, योग्य नियोजन व शेतकर्‍यांची मेहनत यामुळे रोहा तालुक्यात या वर्षी खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात या वर्षी लाल व काळ्या पौष्टिक भाताचे उत्पादन व सेंद्रिय पध्दतीने घेण्यात आले आहे.

रोहा तालुक्यात गेल्या खरीप हंगामात 9741 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती.तर या वर्षी भात लागवडीचे क्षेत्र वाढून 9850 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सरासरी हेक्टरी 32.40 क्विंटल भाताची उत्पादकता होती यातून तीन लाख 15 हजार 608 क्विंटल उत्पादन घेण्यात आले. या वर्षी भात शेतीत काही प्रमाणात शेतकर्‍यांनी सुधारणा केली आहे. कृषी अधिकारी महादेव करे यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहा तालुक्यात शेतकर्‍यांनी जया, कर्जत, जोरदार, रुपाली, कोमल, सुवर्णा, सह्याद्री, चिंटू या भाताच्या वाणाची लागवड केली आली आहे. या वर्षी पारंपरिक शेती लागवडीसह विविध प्रात्यक्षिक पध्दतीने लागवड करण्यात आली. या प्रात्यक्षिकांमध्ये चारसुत्री पध्दत, एसआरटी पध्दत, पट्टा पद्धत यांचा समावेश आहे.एक्सल कंपनीच्यावतीने युरीया डीएपी ब्रिकेट तयार करुन यांचे वाटप करण्यात आले. यामुळे पिकाला योग्य मात्रात पोषक द्रव्ये मिळाली.

या वर्षी समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे चांगले पिक तयार झाले. हेक्टरी उत्पादकता वाढली.त्यामुळे भातशेतीचे उत्पादन तीन लाख 55 हजार 782 क्विंटल भात उत्पादन झाले.

रोहा तालुक्यात सर्वाधिक भाताचे उत्पादन रोहा विभागात हेक्टरी 42.65 क्विंटल, चणेरा विभागात हेक्टरी  41.79 क्विंटल, कोलाड विभागात 30.36 क्विंटल, तर सर्वात कमी नागोठणे विभागात 30.24 क्विंटल भाताचे उत्पादन झाले आहे.

रोहा तालुक्यातील भात शेतीत नवे प्रयोग करण्यात आले असून बियाणे निर्मितीसाठी 50 हेक्टर क्षेत्रावर काळा व लाल भाताची लागवड करण्यात आली. त्याचे उत्पादन चांगले निघाले असल्याने पुढच्या हंगामात हे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. पनवेलमध्ये झालेल्या महोत्सवात रोहा तालुक्यातील काळा व लाल भाताला मोठी मागणी मिळाली.

या वर्षीच्या भात पिक स्पर्धेत रोहा तालुक्यातील केशव होनाजी खरीवले यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला असून त्यांनी हेक्टरी 83 क्विंटल भाताचे उत्पादन घेतले आहे. तर आदिवासी गटात तालुक्यातील बाळू कुशा खंडवी यांनी दूसरा, सोन्या वाल्या हंबीर यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply