पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवारी (दि. 3) उरण तालुक्यातील जासई येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी करण्यात आले होते. स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न मांडून त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य वेचणार्या ‘दिबां’चेच नाव येथील विमानतळाला देण्यात यावे, अशी भूमिका या वेळी सर्वपक्षीयांनी मांडली. या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, उद्योजक जे. एम. म्हात्रे, काँग्रेस नेते महेंद्र घरत, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, कामगार नेते सुरेश पाटील, भूषण पाटील, प्रकल्पग्रस्त संघटनेचे दशरथ पाटील, जे. डी. तांडेल यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती.
सिडकोने कोणालाही विश्वासात न घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो राज्य सरकारला पाठविला आहे. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी येथील भूमिपुत्रांची इच्छा आहे. त्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले असून, लढा उभारण्याचे सूतोवाच बैठकीत करण्यात आले. सिडकोच्या संचालक मंडळासोबत तसेच नगरविकास खात्यासोबत बैठक घेऊन तसेच वेळ पडल्यास केंद्र सरकारची भेट घेऊन प्रयत्न व पाठपुरावा करणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
सिडकोचा निर्णय धक्कादायक -आमदार प्रशांत ठाकूर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याची सर्व भूमिपुत्रांना खात्री असताना काही दिवसांपूर्वी सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही, परंतु प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांना सन्मानाचा मार्ग दाखविण्यासाठी ‘दिबां’नी आयुष्यभर योगदान दिले. त्यांनी दिलेल्या लढ्यामुळेच साडेबारा टक्के भूखंडाचे तत्त्व सर्व ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना लागू झाले. भूमिपुत्रांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, लढे दिले. त्यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, अशी आग्रही मागणी या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
Check Also
पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …