एकेकाळी कडव्या हिंदुत्वासाठी ओळखल्या जाणार्या शिवसेनेने महाराष्ट्राची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ धरली. सोबतच आपल्या मूळ भूमिकेला सोयीस्कर बगल दिली. राजकारणात वेगवेगळ्या युत्या-आघाड्या होत असतात, मात्र त्यासाठी थेट विचारधारेला तिलांजली देणे कुणालाही न पटण्यासारखे आहे.
एकेकाळी जाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी राज्यातील महत्त्वाची पक्ष संघटना म्हणून शिवसेना मानली जायची. हिंदूहृदयसम्राट ही पदवी मानाने मिरविणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांनी तर ‘गर्व से कहो हम हिंदू है’, असे म्हणत आपल्या भूमिकेचा खुलेपणाने प्रचार व प्रसार केला. बाळासाहेब हयात असेपर्यंत शिवसेनेकडून ध्येय-धोरणे आणि विचार यांच्याशी कधीही तडजोड वा प्रतारणा झाली नाही. उलट जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा हुंकार वृद्धिंगत केल्याचा इतिहास आहे. अर्थातच, इतर धर्मांना कमी लेखणे, धर्मा-धर्मामध्ये दुही निर्माण करणे, दंगे घडवून आणणे याचे समर्थन करता येणार नाही, परंतु आपापल्या धर्मासाठी कार्य करण्याचे स्वातंत्र्याला प्रत्येकाला आहे. भारतीय हिंदू धर्माला फार मोठा इतिहास व परंपरा आहे. प्राचीन धर्मांपैकी एक असलेल्या हिंदू धर्माला आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेले आहे. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्माचे महत्त्व अनेक उदाहरणे देत अभ्यासपूर्ण रितीने अधोरेखित केले होते. त्यानंतरही अनेक महनीय व्यक्तींनी, संस्थांनी हिंदू धर्माची पताका फडकवित ठेवली. यामध्ये भारतीय जनता पक्ष नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. भाजपच्या सोबतीने शिवसेनेनेही हिंदुत्वासाठी योगदान दिले, पण स्वार्थ आणि सत्तेच्या मोहापायी बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी मात्र विचारधारेला तिलांजली देऊन हिंदुत्वाला मुंबईच्या वेशीवर टांगले आहे. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आयुष्यभर शिवसेना नेत्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली त्याच पक्षांच्या मांडीला मांडी लावून सध्या शिवसेनेकडून लांगूलचालन सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीच्या भोंग्यांना उत्तर म्हणून ठिकठिकाणी हनुमान चालीसा सुरू केला आहे. मनसेने रामनवमीच्या निमित्ताने शिवसेना भवनासमोर भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवला. यामुळे मनसे नेते यशवंत किल्लेदार आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याचा मनसेने निषेध करीत शिवसेनेचा समाचारही घेतला आहे. या संदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे हिंदूत्व कसे बेगडी आहे हे स्पष्ट केले. हनुमान चालीसा ही आपल्या देशाची एक परंपरा आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना इतका राग का येतो, असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला. भोंगे वाजल्याने राग येत नसेल, तर हनुमान चालीसानेही राग यायला नको, असेही फडणवीस म्हणाले. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला आमचा विरोध नाही, पण लांगुलचालनाला आमचा विरोध आहे हे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत. या वेळी त्यांनी शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला, पण यातून शिवसेना सुधारेल का हा खरा प्रश्न आहे. सत्तेसाठी शिवसेनेची भूमिका सातत्याने बदलत आहे. यातून हळूहळू त्यांची मूळ ओळखच नाहीशी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधूनमधून बाजू सावरण्याचा प्रयत्न करतात, पण जिथे विचारातच खोट निर्माण झाली आहे तिथे कितीही सारवासारव केली तरी लोक विश्वास ठेवणार नाही आणि एक दिवस या दुटप्पी मंडळींना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देतील.