Breaking News

महाराष्ट्र पुन्हा अंधाराच्या खाईत!

भारनियमनावरून विरोधी पक्षनेते फडणवीसांची मविआ सरकारवर टीका

मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी (दि. 12) कोळसा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारनियमनाचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा केली. यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारनियमानावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. फडणवीस यांनी ट्वीट करीत मविआवर राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटल्याची टीका केली आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी, भारनियमन होऊ नये याची काळजी घेत आहोत, पण अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज गळती, वीज चोरी होत आहे. तेथे भारनियमन करून आम्ही सावरण्याचा प्रयत्न करीत आहोत, कारण आम्हाला दरदिवशी बाजारातून 1500 ते 2500 मेगावॅट वीज विकत घ्यावी लागते. त्यासाठी साडेसहा ते 12 रुपयांपर्यंतचा दर आहे. पैशाची टंचाई असताना इतकी महागडी वीज विकत घेणे सोपे नाही, असे म्हटले. याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सावध! ऐका पुढल्या हाका. टँकरमुक्तीतून पुन्हा टँकरयुक्त, भारनियमनमुक्तीतून पुन्हा भारनियमनाकडे, राज्यात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार, ‘नो गव्हर्नन्स’मुळे जनता हैराण असून आता परिणाम दिसू लागले आहेत. अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे.
आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू झाले. यंदा उन्हाच्या झळा तीव्र असताना जनतेला घामाघूम करण्याचे आणि राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचे पाप महाविकास आघाडीने अखेर केलेच. वाफाळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तत्काळ दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे, असेही विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी म्हटले आहे.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply