Breaking News

जादूगार हवा आहे

आधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर  यांचे प्रेझेंटेशन, मग चर्चांचे गुर्‍हाळ, मग समितीचे चर्‍हाट, पुन्हा चिंतन शिबिराची उठाठेव आणि त्यानंतर परदेशातून परतलेल्या माननीय राहुलजी यांचा निर्णय अशा प्रचंड प्रक्रियेतून गेल्यानंतरच काँग्रेसीजनांच्या हाताला पुनर्जन्मासाठी आवश्यक असलेली संजीवनी बुटी लागेल असे दिसते. मात्र इतके घडून देखील काँग्रेस अजूनही आस्ते कदम याच भूमिकेत असली तरी विजयासाठी काहीतरी करायला हवे एवढी भावना या पक्षात निर्माण झाली आहे हेही नसे थोडके.

अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस पक्षामध्ये जेमतेम धुगधुगी उरली आहे. मरणासन्न अवस्थेतील या पक्षाने डोळे किलकिले करून भोवताली जमलेल्या आप्तेष्टांकडे नजर टाकल्यामुळे अनेकांच्या आशा पुन्हा एकदा अंकुरित झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी काही ठोस रणनीती आखण्याच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाने ही हालचाल सुरू केली आहे हे भारतीय लोकशाहीसाठी एक सुचिन्हच म्हणायला हवे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसला 19 टक्के मते मिळाली होती. ही टक्केवारी ग्राह्य धरल्यास काँग्रेस हाच भारतीय जनता पक्षानंतरचा सर्वात मोठा पक्ष आहे हे मान्य करणे भाग आहे. नेतृत्वाचा पत्ता नाही, कार्यकर्ते विखुरलेले आणि संघटनात्मक कामाचा संपूर्ण अभाव या तिन्ही गोष्टींमुळे त्रस्त असलेल्या काँग्रेसची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की या पक्षाला सावरण्यासाठी आता कुठल्या तरी चमत्काराचीच गरज आहे असे वाटावे. तरीही काँग्रेसने हा चमत्कार घडवून आणण्याचे ठरवलेले दिसते. त्यासाठी त्यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासारख्या चमत्कारी अवलियास पाचारण केले आहे. गेल्या आठवडाभरात प्रशांत किशोर ऊर्फ पीके यांच्या श्रीमती सोनिया गांधी तसेच त्यांच्या निकटवर्ती वर्तुळातील बड्या नेत्यांशी बैठका झाल्या असून काँग्रेस दिग्विजयाच्या रणनीतीचे प्रेझेंटेशनही पीके यांनी त्यांच्यापुढे केले. दिग्विजयासाठी काय करावे लागेल याची यादी देखील पीके यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षांकडे दिली असून त्याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी काँग्रेसी प्रथेप्रमाणे एक समिती स्थापन केली आहे. एवढ्या घडामोडी राजधानी दिल्लीत घडत असताना काँग्रेस पक्षाचे अनभिषिक्त नेते राहुल गांधी हे मात्र परदेश दौर्‍यात मग्न आहेत. ते परतल्यानंतर मे महिन्याच्या दुसर्‍या-तिसर्‍या आठवड्यात काँग्रेसी प्रथेप्रमाणेच एखादे चिंतन शिबिर पार पडेल. बहुदा राजस्थानातील उदयपूर येथे असे चिंतन शिबिर घेण्याचा काँग्रेसचा बेत असल्याच्या बातम्या आहेत. प्रशांत किशोर यांना केवळ निवडणूक रणनीतीकार म्हणून नियुक्त करावयाचे की त्यांना थेट पक्षातच दाखल करून घ्यायचे हा काँग्रेसपुढला सध्याचा प्रश्न आहे. गेली आठ वर्षे पीके हे निवडणूक रणनीतीकार म्हणून विविध पक्षांसाठी काम करत आहेत. तेही भरभक्कम मोबदला घेऊन. भाजप, आप, तृणमूल काँग्रेस तसेच बिहारमधील नीतीशकुमार यांचे संयुक्त जनता दल यांना मिळालेल्या यशामध्ये पीके यांच्या रणनीतीचा मोठा वाटा आहे असे बोलले जाते. परंतु या सर्व पक्षांकडे कार्यकर्त्यांची फौज आणि प्रखर नेतृत्व होते हे विसरून चालणार नाही. या दोन्ही गोष्टींची काँग्रेस पक्षाकडे वानवाच आहे. पीके यांच्यासारखा जादुगारच काय, प्रत्यक्ष परमेश्वर जरी अवतरला तरीही काँग्रेस पक्षामध्ये जान फुंकणे त्यालाही कठीणच जाईल. प्रशांत किशोर हा काही निवडणुका जिंकून देणारा परिस नव्हे हे काँग्रेसने लक्षात ठेवावे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply