Breaking News

आठ वर्षांपूर्वी झालेल्या ’त्या‘ हत्येचा आरोपी अटकेत

पनवेल : वार्ताहर

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच आठ वर्षांपूर्वी माथाडी कामगाराच्या हत्येप्रकरणी सराईत गुन्हेगाराला गजाआड केले आहे.

29 डिसेंबर 2012 मध्ये एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियोजित तुर्भे एसटी डेपोच्या गेटवर सेक्टर 20 तुर्भे येथे आनंदा बाबुराव सुकाळे (55) यांची अज्ञात व्यक्तीने डोक्यामध्ये बोथड वस्तूने वार करून तसेच नायलॉनच्या गोणीने गळा आवळून जीवे ठार मारले होते. याबाबत एपीएमसी पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. बी. जी. शेखर पाटील, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड, संदीप गायकवाड, शरद ढोले, सहाय्यक फौजदार पाटील, पोलीस हवालदार साळुंखे, पाटील, गडगे, पवार, तरकासे, वाघ, सुर्यवंशी, पोलीस नाईक कुदळे, म्हात्रे, पाटील, कानू, मोरे, पोलीस शिपाई भोपी आदींचे पथक शोध घेत असताना गुप्त बातमीदार तसेच तेथील सुरक्षा रक्षक यांना विश्वासात घेवून माहिती घेतली असता एका सुरक्षा रक्षकाने हा सर्व प्रकार बघितला होता व त्याबाबत त्याने माहिती देताना सराईत आरोपी दशरथ विठ्ठल कांबळे याची माहिती दिली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

जुगारामध्ये आनंदा सुकाळे यांनी 25 हजार रुपये जिंकले होते ते पैसे जबरीने चोरी करण्यासाठी त्याने ही हत्या केली होती. त्याच्यावर यापूर्वी सुद्धा जबरी चोरी, चोरी, दरोडा असे गुन्हे केलेले असून त्यास यापूर्वी हद्दपार करण्यात आलेली आहे. अखेरीस गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने आठ वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फोडली आहे.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply