Breaking News

पनवेलच्या मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट -दिलीप वेंगसरकर

आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल क्षेत्रातील अनेक मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट आहे, परंतु त्यांना व्यासपीठ नाही. पनवेल महापालिकेमुळे हे व्यासपीठ मुलांना उपलब्ध होणार आहे. भविष्यात येथील मुलेही भारतीय क्रिकेट टिममध्ये खेळू शकतील, असा विश्वास विख्यात क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी शुक्रवारी (दि. 1) केला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी पनवेल महापालिका आणि मे. दिलीप वेंगसरकर फाउंडेशन यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला. त्या वेळी वेंगसरकर बोलत होते.
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ब, प्रभाग क्र.16मधील भूखंड क्र. 28, सेक्टर 11, नवीन पनवेल (पूर्व) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र (अकॅडमी) महापालिकेच्या वतीने लवकरच उभारण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मे. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनशी शुक्रवारी आयुक्त दालनाशेजारील बैठक कक्षात करार करण्यात आला. या वेळी दिलीप वेंगसरकर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती ड अध्यक्ष वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, प्रवीण पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, राजश्री वावेकर, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर आदी उपस्थित होते.
या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले, युवकांसाठी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात महापालिका काम करीत आहे. विविध क्रिडा संकुले आम्ही बांधत आहोत. महापालिका क्षेत्रात उद्याने मैदाने विकसित करीत आहोत या ठिकाणी बॅडमिंटन प्रशिक्षण देणार आहोत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था असावी या विचाराने नवीन पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारत आहोत. प्रसिद्ध किक्रेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या संस्थेची निवड यासाठी करण्यात आली आहे.
आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले की, पनवेल महापालिकेकडून विविध क्षेत्रांत विकास कार्यक्रम राबविले जात आहेत. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वॉर्ड ऑफिसेस याच्या बरोबरीने महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य तंदुरूस्त रहावे या विचाराने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट अकॅडमी उभारण्यात येणार आहे. पालिका हद्दीतील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळले पाहिजेत या हेतूने दिलीप वेंगसरकर यांच्या अकॅडमीची निवड करण्यात आली आहे.
पनवेल शहर आणि तालुक्यातील क्रिकेटवीरांसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई व इतरत्र जावे लागत होते. महापालिका उभारत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे खेळाडूंची ही अडचण दूर होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रात विख्यात क्रिकेटपटू दिलीप वेंगसर यांचे मार्गदर्शन क्रिकेटपटूंना मिळणार आहे. यासाठी मे. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनशी महापालिकेने करार केला आहे. या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक वर्षी 10 ते 19 वयोगटातील किमान 101 विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामधील 50 टक्के विद्यार्थी पमपा क्षेत्रातील, 25 टक्के रायगड जिल्ह्यातील आणि 25 टक्के महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील असणार आहेत.

  • अंदाजित खर्च : 8,84,30,810 रुपये
  • भूखंडाचे क्षेत्रफळ : 29,899 चौमी (7.47 एकर)
  • कामाचे स्वरुप : 150 मी. व्यासाचे क्रिकेट मैदान, पॅव्हेलियन इमारत
  • प्रशिक्षण केंद्र  : 421 चौमी (4529.96 चौ. फूट )
  • वाहनतळ क्षमता : 31 चारचाकी वाहने, 40 दुचाकी वाहने व दोन बस
  • प्रशिक्षण संस्था : मे. दिलीप वेंगसरकर फाउंडेशन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू असलेल्या दिलीप वेंगसरकर यांचे सहकार्याने  पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारत आहोत. त्याचा लाभ घेऊन पनवेलमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू तयार होऊन पनवेल  महापालिका आंतरराष्ट्रीय नकाशावर गेल्याशिवाय राहणार नाही.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका

माझे घरच वाजे-वाजापूर येथे असल्याने मी अनेक वेळा पनवेलला येत असतो. पनवेलच्या मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले आयपीएलपासून विविध स्पर्धांमध्ये निश्चित चांगली कामगिरी करतील असा माझा ठाम विश्वास आहे. एमसीएमध्ये रायगडच्या मुलांना सदस्यत्व मिळाले, तर त्यांना खूप फायदा होईल. मी स्वत: आठवड्यातून दोन ते तीन वेळा येणार आहे, पण मुलांनी खेळाबरोबरच शिक्षणालाही महत्व दिले पाहिजे.
-दिलीप वेंगसरकर, प्रसिद्ध क्रिकेटपटू

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply