तपासणीची आवश्यकता
खोपोली : प्रतिनिधी
गरीब व कष्टकर्यांना किमान एक वेळ पोटभर जेवण मिळावे, या उद्देशाने राज्य सरकाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली खरी, मात्र काही केंद्राचा अपवाद वगळता अनेक केंद्रात थाळी रिकामी असूनही, केंद्र चालकांचे पोट मात्र भरत आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी केंद्रांच्या तपासणीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
राज्य सरकाने 2020 मध्ये शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे. गरीब व गरजूंना शिवभोजन थाळी योजनेमुळे किमान एक वेळच्या जेवणाची सोय व्हावी, हा हेतू आहे. अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण यामुळे शिवभोजन थाळी केंद्राबाहेर रांगा लागतात. डाळ, भात, दोन चपात्या आणि भाजी यामुळे भरपेट जेवण मिळते.
शहर, किंवा तालुक्याच्या ठिकाणी तसेच रुग्णालयानजीक, बसस्थानके, शासकीय कार्यालये, बाजारपेठेची ठिकाणे या ठिकाणी ही शिवभोजन थाळी केंद्रे सुरू करण्यात आली. शिवभोजन थाळी घेताना आधारकार्ड क्रमांक नमूद करून त्याचा फोटो घेतला जातो. परंतु काही ठिकाणी भोजन थाळी ऐवजी थंडगार पाण्याची बाटली तर काही ठिकाणी वडापाव देवून फोटो घेतले जातात. केवळ फोटोसाठी काही केंद्र चालकांनी लाभार्थी तयार केले आहेत. त्यामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून, पुरवठा विभागाने शिवभोजन केंद्रावर प्रत्यक्ष भेट देवून सत्य परिस्थिती तपासणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शिवभोजन थाळी केंद्रावर सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे, असे अनेक जणांनी सांगितले.
शिवभोजन केंद्राच्या ठिकाणी सीसीटिव्ही आवश्यक असताना अनेकांनी ते बसवले नाहीत. ग्रामीण भागात अनेक तक्रारी असून पुरवठा विभागाचे लागेबांधे असल्याचे अनेक जण सांगतात. खालापूर तालुक्यात 15 शिवभोजन केंद्र असून प्रामाणिकपणे केंद्र चालविणार्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण भागातील केंद्र चालकांना एका थाळीमागे शासन पंचवीस रुपये देते तर शहरी भागासाठी पन्नास रुपये दिले जातात. तीन तीन महिने केंद्र चालकांना शासनाकडून बिलाची रक्कम मिळत नसून गेल्या काही महिन्यात तेल, भाजी वाढलेले दर यामुळे केंद्र चालक मेटाकुटीला आले आहेत.