Breaking News

बिरवाडी ग्रामपंचायतीविरोधात दिव्यांगांचा एल्गार

महाड पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील अपंगांना शासकिय निधी व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने पाठपुरावा सुरू असून त्यांना त्यांचा लाभ मिळत नसल्याने प्रहार संघटनेतील दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी (दि. 20) महाड पंचायत समितीवर आंदोलन करत बिरवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.

बिरवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात प्रहार अपंग क्रांती संस्थेतर्फे महाड पंचायत समिती कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. दिव्यांगांना शासकीय निधी व योजनेचा लाभ मिळवून देताना ग्रामपंचायत विभाग चालढकल करत असल्याने अपंगापर्यंत विविध योजना व निधी पोचत नसल्याचे सांगून हा धडक मोर्चा काढण्यात आला. संस्थेचे कोकण प्रांत अध्यक्ष सुरेश मोकल, मुंबई जिल्हा अध्यक्ष विशाल वाघमोडे, पनवेल तालुका उपाध्यक्ष प्रकाश पाटील, माणगांव तालुका अध्यक्ष पांचाळ, महाड तालुकाध्यक्ष फैज हुर्जुक यांच्यासह दिव्यांग बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.

महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायत गेली कांही वर्ष दिव्यांगाना एकूण उत्पन्नातून देण्यात येणारा निधी देत नसल्याची तक्रार या वेळी करून सदर निधीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला. यामुळे जोपर्यंत या निधीचा घानादेश मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका फैज हुर्जुक आणि इतर पदाधिकार्‍यांनी घेतली. पाच टक्के निधी तात्काळ देवून संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील प्रहार संघटने मार्फत करण्यात आली. या वेळी विजय मोरे, रमा चौगले, रेश्मा मोरे, काकासाहेब सावरे, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, राजेंद्र पांचाळ, भरत भुईर, मेहबूब अतार, सचिन सुतार, मोहसिन दरेखान, सनिल जंगम, इम्रान कोंडेकर, राजेंद्र शिंदे, इम्रान सावंत, धनंजय शिंदे, छाया पारदुले, मंजूषा साबळे, सबरीन ईसाने, आलिया धामणकर, शबनूर पटेल, आफरी आलेकर, मंगेश महाडीक, महेश सुतार, शशिकांत जाधव आदि उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply