Breaking News

काँग्रेस नेते नाराज; मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यासंदर्भात थोरात यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानुसार नाराजीच्या कारणांबाबत सोमवारी (दि. 15) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे.
काँग्रेसला सरकारमध्ये मिळत असलेले दुय्यम स्थान, निर्णय प्रक्रियेतील सहभाग, विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांचे वाटप यावर बैठकीत चर्चा होणार आहे. यासंदर्भात नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची गुरुवारी मुंबईमध्ये बैठक झाली. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देण्यात यावे, अशी मागणी या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी केली होती. या बैठकीनंतर आता काँग्रेस नेते त्यांची तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत.
महाविकास आघाडी सरकार चालवताना निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी केले जात नसल्याचा आक्षेप काँग्रेस नेते आणि मंत्र्यांचा आहे. कोरोनाच्या संकटात घेण्यात येत असलेले निर्णय तिन्ही पक्षांशी चर्चा करून घेणे काँग्रेसला अपेक्षित आहे. सध्याच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसतंय, अशी काँग्रेसची धारणा झाली आहे. त्यामुळे सरकारमध्ये अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची खदखद काँग्रेसमध्ये आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री न मिळाल्याने तसेच विधान परिषदेत एक जागा कमी मिळाल्यामुळे आणि आता निर्णय घेताना स्थान नसल्याने काँग्रेस नाराज आहे. याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आम्ही महाराष्ट्रात सत्तेत असलो, तरी मोठे निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नाही, असे म्हटले होते. राहुलबाबांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करून सरकारमध्ये काँग्रेसचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले जात नसल्याचे राज्यातील काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे.
…तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा -आठवले
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे अस्तित्त्वात आले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून निर्णयप्रक्रियेत त्यांना डावलले जात असेल तर काँग्रेसने या सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे रिपाइंचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ते शनिवारी (दि. 13) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply