Breaking News

लाचखोर सहाय्यक जिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात

अलिबाग : प्रतिनिधी
एमआयडीसीतील जागेच्या कामासंदर्भात 30 हजारांची लाच स्वीकारताना रायगडचे सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र साटम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे जिल्हा निबंधक कार्यालयातील खाबूगिरी समोर आली आहे.
तक्रारदार यांचा कन्सस्लटिंगचा व्यवसाय असून ते एमआयडीसीमधील प्लॉटचे डॉक्यूमेंट एज्युडीकेशन संबंधीचे काम त्यांना प्राप्त अधिकार पत्रांनव्ये करीत असतात. तक्रारदार यांच्याकडे एज्युडीकेशन कामाकरिता आलेल्या तीन फाईल्स त्यांनी कलेक्टर ऑफ स्टॅम्प ऑफिस अलिबाग येथे जमा केल्या होत्या तसेच त्या फाईल्सची ऑनलाइन फी भरून त्यास आवश्यक ते कागदपत्रे जोडून संबंधित कार्यलायात जमा केल्या होत्या. त्या तीन फाईलचे एज्युडीकेशन करण्याकरिता कलेक्टर ऑफ स्टॅम्प ऑफिस अलिबाग येथील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी देवेंद्र साटम यांनी प्रत्येक फाईलमागे फायनल ऑर्डर देण्याकरिता प्रत्येकी 15 हजार अशी एकूण 45 हजार लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांच्याकडून नवीन सबमिट केलेली ऍग्रिमेंट फॉर जॉब वर्कची एक फाईलच्या पूर्तीकरिता आरोपी लोकसेवक यांनी पाच लाख रुपये व पूर्वी जमा केलेल्या तीन फाईलपैकी दोन फाईल व एक पेंडिंग फाईल अशा तीन एज्युकेशनच्या फाईलकरिता प्रत्येकी 10 हजार प्रमाणे तीन फाईलचे 30 हजार रुपये असे चार फाईल मिळून पाच लाख 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
या सदंर्भात नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार रात्री साटम यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या वेळी पथकाने कार्यालयाची झाडाझडती घेतली असता साटम यांच्या टेबलात पाच लाख 63 हजारांची रोकड सापडली. ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शिवराज बेंद्रे  यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply