जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार; कोरोना कक्षात लावली होती ड्यूटी
अलिबाग : प्रतिनिधी
एकीकडे संपूर्ण देश कोरोना विरुद्ध लढत आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. डॉ. आरसरे आणि डॉ. हिवरे अशी दोघांची नावे आहेत. त्यांनी आपले राजीनामे रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. राजीनामे देण्याआधी डॉक्टर, प्रशासन अधिकारी यांनी त्याचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते आपल्या मतावर ठाम राहिले आहेत. करोनाला हद्दपार करण्यासाठी शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत. जिल्ह्यात अलिबाग, पनवेल, पेण, माणगाव, महाड याठिकाणी कोरोना बाधितांसाठी विलगिकरण, अलगिकरण कक्षाची निर्मिती केलेली आहे. या ठिकाणी डॉक्टर, परिचारिका, वार्ड बॉय याच्या ड्युटी लावण्यात आलेल्या आहेत. त्याच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारीही घेण्यात आलेली आहे. डॉ. आरसरे आणि डॉ हिवरे यांची कोरोना विषाणूच्या अनुषंगाने त्याची ड्युटी लावण्यात आलेली होती. मात्र ही ड्युटी नको म्हणून दोघांनीही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे आपले राजीनामे दिले आहेत. रायगड जिल्हा रुग्णालयात डॉक्टर कमी आहेत. त्यातच या दोघांनी राजीनामे दिले. कठीण परिस्थितीत डॉक्टरांनी राजीनामे दिल्याने त्यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी आपली जबाबदारी झटकून राजीनामा दिला आहे. माझ्याकडे त्याचा राजीनामा आल्यानंतर त्यांनी अशा कठीण परिस्थितीत त्वरित रुजू होण्याचे आदेश देणार असून जिल्हाधिकारी यांच्याकडेही अहवाल पाठविणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर होणार्या कारवाईस ते स्वतः जबाबदार राहणार आहेत.
-डॉ. प्रमोद गवई, जिल्हा शल्यचिकित्सक