Monday , June 27 2022
Breaking News

‘दिबां’च्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडको घेराव आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी ‘दिबा’साहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात 24 जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने बुधवारी (दि. 22) पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आगरी समाज मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सहचिटणीस संतोष केणे, खजिनदार जे. डी. तांडेल यांनी आंदोलनासंदर्भात माहिती दिली. विजय गायकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी मागील आंदोलनाची पार्श्वभूमी सांगतानाच ‘दिबां‘चे नाव विमानतळाला लागेपर्यंत आणि भूमिपुत्रांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा कायम राहणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांनी मागील वर्षी 10 जूनला भव्य साखळी आंदोलन, 24 जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी मशाल मोर्चा, 17 मार्चला भूमिपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनी काळा दिन आंदोलन, 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन अशी भव्य आंदोलने केली, मात्र सिडको आणि महाराष्ट्र सरकार प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आली आहे. त्यामुळे येथील भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मागील 24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनात सिडकोकडे विमानतळाच्या पूर्वीचा नामकरणाचा ठराव विखंडित करून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव करावा असे निवेदन दिले होते, मात्र वर्ष उलटले तरी त्यावर सिडको अथवा शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही. सुदैवाने भूमिपुत्रांच्या एकीमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव अद्याप मंत्रिमंडळाच्या बैठकीत अथवा विधानसभेत आणला गेला नाही.
सिडको आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारने नवी मुंबई वसविताना रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्ट्यामधील 95 गावांतील 65 हजार शेतकर्‍यांच्या कुटुंबाच्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित केल्या आणि त्यावर सिडकोने हजारो कोटी कमावले आहेत, पण 100 टक्के भूमिहीन केलेल्या प्रकल्पग्रस्तांना काही द्यायचे झाले की सिडको उदासीन दिसते. म्हणूनच प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित असल्याचे दिसत आहे. प्रकल्पग्रस्तांचे शिक्षण, नोकरी, साडेबारा टक्के भूखंड, गरजेपोटी बांधलेली बांधकामे, गावठाण विस्तार, विमानतळबाधित 27 गावांच्या समस्या, नैना प्रकल्पाच्या समस्या असे अनेक प्रश्न सिडकोच्या उदासीन वृत्तीमुळे प्रलंबित आहेत. यापूर्वी सिडकोत अनेक ठराव होऊनही प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित केली जात नाहीत. यासाठी नुकताच केलेल्या शासन निर्णयात 250 मीटरचे निकष, भाडेपट्टा अशा अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. सिडकोच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जून रोजी सकाळी 11 वाजता सिडको घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृती समितीच्या वतीने सांगतानाच या आंदोलनात भूमिपुत्रांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

या आहेत मागण्या…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाबाबत 28 एप्रिल 2021 रोजी सिडकोने केलेला ठराव विखंडीत करून भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या भावना लक्षात घेऊन लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा नवीन ठराव सिडकोने करावा, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना विनाविलंब साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप करावे, 25 फेब्रुवारी 2022 रोजी सरकारने काढलेला, नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांबाबतच्या शासन निर्णयात प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन बदल करण्यात यावेत, विमानतळबाधित 27 गावांच्या समस्या त्वरेने सोडवाव्यात, प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न बैठका घेऊन तातडीने सोडविले जावेत.

24 जूनचा लढा हा ऐतिहासिक दिन म्हणून ओळखला जाणार आहे. निस्वार्थी व आदर्श जीवन असलेले ‘दिबा’साहेब हे सर्व समाजाचे आदर्श आहेत. विमानतळाला त्यांचे नाव द्यावे यासाठी सन 2008पासून मागणी होत आहे. हे आंदोलन राजकारणविरहित आणि भूमिपुत्रांचे आहे. हा लढा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. येत्या ऑक्टोबर महिन्यात दिल्ली येथील रामलीला मैदानावर होणार्‍या मेळाव्याला दोन लाख लवणकार उपस्थित राहणार असून त्या वेळीही ‘दिबा’साहेबांच्या नावाचा गजर होणार आहे.
-दशरथ पाटील, अध्यक्ष, कृती समिती

शासन ही एक अंमलबजावणी करणारी संस्था असते. त्यामुळे भूमिपुत्रांच्या मागण्या शासनदरबारी पोहचवून त्या मार्गी लावण्यासाठी हा लढा आहे. आम्ही कुणाच्या विरोधात नाही, तर भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवावेत यासाठी त्या-त्या संस्थांकडे मागणी करतोय. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायला खूप मोठे प्रकल्प आहेत, मात्र या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे दैवत दिवंगत दि. बा. पाटीलसाहेबांचेच नाव हवे आणि त्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार. मागील वर्षी 24 जूनला लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते. ते आंदोलन शिस्तीने झाले होते आणि संपूर्ण देशाला भूमिपुत्रांची ताकद दाखवून दिली होती. आताच्या आंदोलनात 20 ते 25 हजार भूमिपुत्र सहभागी होतील आणि आमचा लढा हा विजयी होईपर्यंत सुरूच राहील.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष, कृती समिती

स्वतःच्या घराकडे लक्ष न देता प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांसाठी ‘दिबा’साहेबांनी आयुष्य खर्ची केले. जनतेच्या प्रश्नांसाठी ते लढले. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाचा ठराव विखंडित करावा व त्या जागी ‘दिबा’साहेबांच्या नावाचा ठराव करावा.
-संतोष केणे, सहचिटणीस, कृती समिती

भूमिपुत्रांचे विविध प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सिडकोची आहे आणि आता त्याचा विसर सिडकोला पडला आहे. सिडकोने बेकायदेशीर ठराव रद्द करावा.
-जे. डी. तांडेल, खजिनदार, कृती समिती

Check Also

नागरी समस्यांबाबत भाजपची तत्परता

कळंबोलीतील उघड्या गटारांना झाकणे बसविण्याची मागणी सभापती प्रमिला पाटील यांचे सिडकोला निवेदन कळंबोली : रामप्रहर …

Leave a Reply