Breaking News

नेरळ येथील खुनाची उकल; दोन युवकांना अटक

कर्जत : बातमीदार

नेरळ-कळंब रस्त्यावर 28मे रोजी जळालेला मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून त्यांनी या प्रकरणी दोघाजणांना अटक केली आहे. दिनेश केवट आणि मोहमद अहमद हुसेन असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी पैशांच्या वादातून हरेश लोट याची हत्या करून, त्याचा मृतदेह कळंब-नेरळ रस्त्यावर नेवून जाळून टाकला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

बदली ड्रायव्हर म्हणून काम करणारा हरेश लोट हा  आपल्या आई सोबत कर्जत मुद्रे येथे राहत होता. गावाच्या वेशीवरील भंगार विक्रेता दिनेश राममिलन केवट आणि मोहमद अहमद हुसेन यांच्याकडे तो खंडणी सारखी पैशाची मागणी करीत असे. ते दोघेदेखील त्याला काही पैसे देत होते. 28 मे रोजी पैशांच्या कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या हरेश लोट याच्या बरोबर दिनेश केवट आणि मोहमद यांची झटापट झाली. त्यावेळी दिनेश केवट याने दुकानातील हत्यार डोक्यात घालून हरेशला ठार मारले. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुरुस्तीसाठी असलेली एका गाडीमध्ये हरेशचा मृतदेह भरून दिनेश व महमद यांनी कळंब-नेरळ रस्त्यावरी ओसाड जागेत नेला. तेथे  पेट्रोल व गवत टाकून मृतदेह पेटवून दिला. व तेथून पुन्हा कर्जत गाठले.

जळालेल्या मृतदेहाची ओळख पटविणे हे पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र मृतदेहावरील अर्धवट जळालेल्या अंडरवेअरवरून नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आरोपीपर्यंत पोचले. अंडरवेअरवरून जळालेला मृतदेह कर्जत मुद्रे येथील नानामास्तर नगर भागातील बदली गाडीचालकाचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, कर्जत पोलीस ठाण्यात 16 जून रोजी हरेश पांडुरंग लोट हा तरुण हरवलेला आहे, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस पथकाने 24 जून रोजी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी दिनेश केवट आणि मोहमद अहमद हुसेन (सध्या रा. कर्जत, मुळ रा. सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश) यांना न्यायालयाने 28 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अशोक दुघे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकांत काळे, महेश धोंडें यांच्या पथकाने केले.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply