Breaking News

केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांना निवेदन

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाच लाख रुपये द्यावेत -सुनील गोगटे

कर्जत : बातमीदार

विमा संरक्षण अंतर्गत पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाच लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी संघर्ष समितीचे सुनील गोगटे यांनी नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भास्कर कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

आपल्या हक्काच्या पैशासाठी पेण बँकेच्या ठेवीदारांनाचा 12 वर्षापासून लढा सुरु आहे. बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या मुदत ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी संघर्ष समितीचे सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भास्कर कराड यांची नुकताच नवी दिल्लीत भेट घेतली. त्या वेळी त्यांच्या सोबत सर्वेश गोगटे, अक्षय सर्वगोड, राहुल मसणे आदी उपस्थित होते.

पेण को-ऑप बँकच्या दीड लाख ठेवीदारांचे पैसे 12वर्षांपासून अडकून पडले आहेत.

अनेक ठेवीदार 75 वर्षावरील झाले असून त्याच्या ठेवीवरील व्याजावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र बँक बुडीत निघाल्यापासून त्यांची अवस्था फार वाईट झाली आहे. बँक बुडाल्याच्या धक्क्याने अनेक ठेवीदार मृत्युमुखीदेखील पडले आहेत. ठेवीदारांनी भविष्यासाठी जमा केलेल्या पुंजीवर बँकेच्या विश्वस्त मंडळाने डल्ला मारला असून त्यामुळे सामान्य ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली आहे. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत, यासाठी पेण अर्बन बँक संघर्ष समितीचा लढा सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघर्ष समितीचे सुनील गोगटे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भास्कर कराड यांची भेट घेतली.

या वेळी गोगटे यांनी, पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना विमा संरक्षण अंतर्गत पाच लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी केली.

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्य ठेवी परत मिळाव्यात, यासाठी भारत सरकारचा अर्थ विभाग सकारात्मक आहे. आपण लवकरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन, रिझर्व्ह बँकेला काय सांगता येईल? याविषयी विचारविनिमय करणार असल्याचे भास्कर कराड यांनी पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply