नागपूर : प्रतिनिधी
अडीच वर्षांचा काळ वाया गेला आहे. आता उर्वरित अडीच वर्षांत पाच वर्षांचे काम करायचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 13) येथे केले. भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या समारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार रामदास तडस, डॉ. अशोक उईके, आमदार विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर, प्रवीण दटके, रामदास आंबटकर तसेच इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आता आपले सरकार आले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व मी उपमुख्यंत्री आहे. अडीच वर्षे निघून गेली आहेत. आता पुढील अडीच वर्षांत पाच वर्षांची धाव आपल्याला घ्यायची आहे. महाराष्ट्राची जी घडी विस्कळीत झाली होती; भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचारांची मालिका सुरू होती ती थांबवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला ट्रॅकवर आणून तो वेगाने धावला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे.
मागच्या काळात शेतकर्यांवर आपत्ती आल्यावर राज्य सरकार घोषणा करायचे, मात्र पैसे देत नव्हते, परंतु आपल्या सरकारने एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला. इतरही विविध प्रकारची मदत आपण देणार आहोत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात भाजपने लोकाभिमुखता, आधुनिकता दिली. नंतरच्या काळात मलाही प्रदेशाध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. तत्पूर्वीच विदर्भाचे सुपूत्र असलेल्या सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर आणि आता चंद्रशेखर बावनकुळे यांनाही मिळाला. तळागाळातील कार्यकर्ता पक्षातील प्रदेशाध्यक्षपदासारख्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो याचा आदर्श म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Check Also
लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली
पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …
RamPrahar – The Panvel Daily Paper