Breaking News

‘ती’ 14 गावे नवी मुंबई मनपात

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्राथमिक अधिसूचना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी
ठाणे तालुक्यातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागामार्फत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राज्य सरकारने 25 वर्षांपूर्वी नवी मुंबई पालिकेत समाविष्ट केलेली मुंबई-पुणे महामार्गावरील (दहिसर मोरी भागातील) ती 14 गावे नंतर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे 15 वर्षांपूर्वी वगळण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता, पण त्याच ग्रामस्थांच्या आग्रहाखातर अखेर ती 14 गावे नवी मुंबई पालिकेत अधिकृतरीत्या समावेश करण्यात आली. तसा अध्यादेश नगरविकास विभागाने सोमवारी काढला आहे. ठाणे जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या या गावांचा मागील 15 वर्षांत योग्य तो विकास न झाल्याने ग्रामस्थांनी ही गावे नवी मुंबई पालिकेत पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत, असे साकडे तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. या ग्रामस्थांची मागणी मुख्यमंत्र्यांनी अध्यादेशाद्वारे पूर्ण केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2021 ते मे 2022 कालावधीत मुदत संपणार्‍या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे, मात्र ठाणे तालुक्यातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याची कार्यवाही सुरू असल्याने त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली आणि त्यानंतर हद्दवाढीची कार्यवाही झाल्यास ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येईल. नव्याने स्थापित नागरी प्राधिकरणांच्या निवडणुका घ्याव्या लागतील परिणामी निवडणुकीवर दुहेरी खर्च होईल. या बाबी विचारात घेता ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. या संदर्भात नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठविले आहे.
ही आहेत गावे
दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या 14 गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.  त्यानुसार याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply