Breaking News

विचुंबे-नवीन पनवेल नव्या पुलासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्‍या नव्या पुलाच्या उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन मंत्रीमहोदयांना निवेदनही दिले.
या शिष्टमंडळात विचुंबे गाव भाजप अध्यक्ष के. सी. पाटील, विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, माजी उपसरपंच किशोर सुरते, नितीन भोईर, अनिल भोईर, अविनाश गायकवाड, अनंत गायकवाड, महेश भिंगारकर, डी. के. भोईर चेतन सुरते, दामाजी भिंगारकर, संजय भिंगारकर, गोरख धुमाळ आदींचा समावेश होता.
मंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील बाह्य रस्ते विकास योजनेंतर्गत पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवा पूल बांधण्यासाठी एमएमआरडीएमार्फत 22 नोव्हेंबर 2018 रोजी तीन कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती. हे विकासकाम करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते, परंतु ते रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणार्‍या रस्त्यांवर येत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यासाठी रा.जि.प. कार्यकारी अभियंता यांनी एमएमआरडीएला 7 फेबु्रवारी 2019 रोजी पत्रान्वये कळविले आहे, परंतु या कामासाठी निधी अतिशय अल्प असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल हे काम करण्यास इच्छुक नसून काम पूर्ण होण्यास बराच कालावधी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच या पुलाच्या बांधणीसाठी अंदाजे सात-आठ कोटी रुपये लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेलने कळविले आहे.
या अनुषंगाने गाढी नदीवरीर विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवा पूल उभारणीसाठी तातडीने निधी देण्याबाबत सहकार्य करावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे या वेळी केली.

Check Also

‘दिवाळी पहाट’ने पनवेलकर मंत्रमुग्ध महापालिकेकडून मतदान जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित …

Leave a Reply