
उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील बीपीसीएल राष्ट्रीय प्रकल्प भेंडखळ येथे कार्यरत असून येथील ग्रामस्थांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने बीपीसीएल प्रकल्पाला दिल्या. शेतजमीनीच्या बदल्यात शेतकर्यांना नोकरी देण्याचे आश्वासनही कंपनी प्रशासनाने शेतकर्यांना दिले होते, मात्र भेंडखळ येथील प्रकल्पग्रस्त अविनाश रमण ठाकूर यांना 30 ते 35 वर्षे झाले तरीही नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे अविनाश ठाकूर यांनी कंपनी गेटसमोरच रविवार (दि. 17)पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाला भेंडखळ ग्रामस्थ मंडळ, भारतीय जनता पक्षाचे मिलींद पाटील, भारतमुक्ती मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा सूर्यवंशी, बहुजन क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मनोज रामधरणे, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष धर्मपाल जाधव, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष जंगबहादुर चौधरी, बहुजन मुक्ती पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उरण तालुका उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर, छत्रपती क्रांती सेनाचे रायगड जिल्हाध्यक्ष श्रेयश म्हसकर, वारकरी संप्रदायाचे प्रभाकर ठाकूर आदी विविध संघटनेच्या पदाधिकार्यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper