Breaking News

आदिवासी बांधवांना जॉबकार्डसाठी जि. प. राबविणार विशेष मोहीम

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून, तसेच स्थलांतर रोखण्यासाठी व मोठ्या प्रमाणात आदिवासी मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत नवीन जॉब कार्ड देणे, जॉब कार्डचे अद्यावतीकरण करणे, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत तालुकास्तरावर 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकार्‍यांना दिल्या आहेत. आदिवासी समाजाचा आर्थिक, सामाजिक विकास करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र तरीही आदिवासी बांधव सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रायगड जिल्हा परिषदेने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान आदिवासी बांधवांना जॉब कार्ड काढून देणे, जॉब कार्ड अद्यावतीकरण करण्यासाठी तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालय किंवा तालुक्यातील सोयीच्या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. 28 नोव्हेंबर रोजी अलिबाग, कर्जत, माणगाव, मुरुड, पनवेल, रोहा, श्रीवर्धन तालुक्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, 29 नोव्हेंबर रोजी खालापूर, म्हसळा, पेण, पोलादपूर, तळा, उरण येथे तर 30 नोव्हेंबर रोजी महाड, सधागड तालुक्यात शिबिर पार पडेल. या शिबिरांमध्ये सर्वहरा जन आंदोलनाचे पदाधिकारी, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, विस्तार अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच शिबिराच्या पूर्वतयारी करिता तालुकास्तरावर आढावा सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती, रोजगार हमी योजना सहाय्यक गटविकास अधिकारी संजय चव्हाण यांनी दिलीे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply