Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान

राजकीय पक्षांसह प्रशासन सज्ज, पोलीसही दक्ष

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी  रविवारी (दि. 18) मतदान होत आहे. त्यासाठी राजकीय पक्षांबरोबर जिल्हा प्रशासनाची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी 618 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन लाख 97 हजार 370 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
रायगड जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, एक हजार 429 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित 191 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी सरपंच आणि सदस्यपदासाठी मतदान होईल. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन हजार 708 जणांची नेमणूक केली असून निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य घेऊन अधिकारी, कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले. रविवारी सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल.
या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेनेबरोबरच नव्याने निर्माण झालेली बाळासाहेबांची शिवसेनाही पहिल्यांदाच सर्व ताकदीनिशी या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. काही ठिकाणी स्वबळावर, तर काही ठिकाणी युती-आघाडी करून निवडणूक लढविली जात आहे. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. 20) तालुक्याच्या ठिकाणी लागणार आहे.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply