रोह्यात आढावा बैठक; प्रमुख नेते, पदाधिकार्यांची उपस्थिती
धाटाव : प्रतिनिधी
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची संयुक्त आढावा बैठक शनिवारी (दि. 14) रोह्यात आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रतोद व आमदार भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
धाटाव एमआयडीसीतील आरआयआरसी हॉलमध्ये झालेल्या बैठकीस बाळासाहेबांच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, भाजप नेते अॅड. महेश मोहिते, प्रदेश सरचिटणीस रवी मुंढे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, वैकुंठ पाटील, सरचिटणीस अविनाश कोळी, मिलिंद पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष हेमा मानकर, पेणच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, भाजप रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख अॅड. मनोजकुमार शिंदे, उपतालुकाप्रमुख संदेश मोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीनंतर भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, रायगड जिल्ह्यात एकूण 10,123 इतके शिक्षक मतदार आहेत. त्या सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकार्यांची संयुक्त बैठक झाली. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व सहकार्यांनी सर्व शिक्षक मतदारांना या निवडणुकीत योग्य उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन करावे. महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे या निवडणुकीत म्हात्रे सर विजय संपादित करतील असा विश्वास आहे.
मागच्या निवडणुकीत आम्ही वेगवेगळे लढलो, परंतु आताची परिस्थिती ही वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना व भाजप सिंधुदुर्गपासून पालघरच्या टोकापर्यंत एकत्र येऊन लढत आहोत तसेच इतर सहकारी पक्ष आमच्यासोबत आहेत. शिक्षक मतदारही आम्हाला पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ताकद निश्चित वाढलेली आहे, असे आमदार भरत गोगावले म्हणाले. आमदार रविशेठ पाटील यांनीही ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयी करण्याचे आवाहन केले, तर उमेदवार म्हणून बोलताना ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मला संधी द्यावी. शिक्षकांचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावू, अशी ग्वाही दिली.