Breaking News

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर जबरी चोरी

सहा आरोपींना 24 तासांत अटक

आठ लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त

पनवेल ः वार्ताहर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाताण बोगद्याच्या अगोदर सहा जणांच्या अज्ञात टोळीने एका व्यक्तीस लाखो रुपयाला लुटल्याची घटना घडली. या प्रकारानंतर गाडी तेथेच सोडून ती टोळी पसार झाली. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच, पोलिसांनी या आरोपींना अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. त्यांच्याकडून गाडीसोबत एकूण आठ  लाख 17 हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.

आजिनाथ राख (वय 37) हे पहाटेच्या सुमारास गाडीतून ठाण्याहून पुणेकडे जात असताना भाताण बोगद्याजवळ त्यांच्यामागे आलेल्या एर्टिगातील अनोळखी सहा जणांनी त्यांच्या गाडीला ठोकर मारल्याचा बहाणा करून गाडी जबरदस्तीने थांबवली. त्यानंतर आजिनाथ यांना मारहाण करून खालापूर फूड मॉल येथे घेऊन गेले व त्यांच्या गाडीत असलेली एक लाख 97 हजार रुपये, ओपो कंपनीचा मोबाईल फोन व इतर ऐवज असा मिळून जवळपास दोन लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला.

याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक संजय गळवे, सपोनि पाळदे, पो.उप.नि आकाश पवार, पो.हवा. महेश धुमाळ, सुनील कुदळे, पंकज चंदिले, पो.ना. राकेश मोकल, पो.शि. आकाश भगत, भीमराव खताळ यांची पथके तयार करण्यात आली.

पथकाने प्रवासादरम्यानचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले. टोलनाक्यावरून फास्टटॅग स्कॅनच्या मदतीने नमूद मोटार कारचा क्रमांक प्राप्त केला. त्यावरून फास्टटॅगधारकाचा  मोबाईल क्रमांक मिळाला. तपासादरम्यान ही कार पुन्हा खालापूर टोल नाक्यावरून मुंबईकडे पास झाल्याची माहिती मिळाली. वाहनमालकास त्वरित ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपी राजू पुकळे (25, रा. कळंबोली), प्रमोद कोकरे (28, रा. कोपरखैराणे), मायाप्पा वळकुंदे (24, रा. कळंबोली), किरण सरगर (28, रा. कामोठे), अशोक पाटील (23, रा. कळंबोली), संदीप कोकरे (23, रा. कुर्ला) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गाडीसोबत एकूण आठ लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply