Breaking News

वावर्ले येथे साकारतोय मुंबई विभागातील सर्वांत लांब रेल्वे बोगदा

कर्जत : प्रतिनिधी
पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावर नवी दुहेरी मार्गिका टाकण्याचे काम केले जात आहे. या मार्गावर कर्जत ते वावर्लेदरम्यान उभारला जात असलेला बोगदा मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा असल्याचे सांगण्यात येत आहे.
याआधी 2005मध्ये पनवेल-कर्जतदरम्यान एकेरी मार्गिका टाकण्यात आली होती. त्या मार्गिकेतील वावर्ले ते हालिवली बोगद्यात तांत्रिक अडचणींमुळे उपनगरीय लोकल गाड्या चालविल्या जात नाहीत. त्या वेळी बनविण्यात आलेला मार्ग हा एकेरी असल्याने वाहतुकीस फायद्याचा नव्हता. त्यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पनवेल-कर्जतदरम्यान दुहेरी मार्गिका टाकण्याचे काम सुरू आहे. या नवीन मार्गामुळे कल्याणमार्गे कर्जतला जाण्याच्या तुलनेत या मार्गावरून वेळेची बचत होणार आहे. या मार्गामुळे पनवेल व कर्जत या शहरांचा वेगवान विकास होईल, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद गुप्ता यांनी सांगितले.
एमआरव्हीसीच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीन (एमयूटीपी-3) अंतर्गत पनवेल-कर्जत लोकल आकारास येत आहे. या रेल्वेमार्गावर नढाळ, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. यापैकी वावर्ले बोगदा 2600 मीटर लांबीचा आहे. नढाळची लांबी 219 मीटर आणि किरवलीची लांबी 300 मीटर आहे. वावर्ले बोगदा पूर्ण झाल्यावर हा मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. सध्या मध्य रेल्वेवरील वापरात असलेल्या पारसिक बोगद्याच्या तुलनेत हा बोगदा दुपटीने लांब आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply