Breaking News

शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवा -आमदार प्रशांत ठाकूर

खोपोली ः प्रतिनिधी

सबका साथ सबका विकास हा अनमोल विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिला. कार्यकर्त्यांनी त्याचे पालन करून जनसामान्यांपर्यंत पोहचून शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्यांचा प्रसार करावा, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथे केले.

भाजप जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांच्या देवन्हावे येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 4) उशिरा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

या कार्यक्रमास माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र साटम, भाजप जिल्हा संघटक अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहेरे, उपाध्यक्ष राजेश मपारा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, किरण ठाकरे, नितीन कांदळगावकर, विठ्ठल मोरे, अ‍ॅड. राजेंद्र येरुणकर, तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह खालापूर कर्जत, सुधागड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या जनसंपर्क कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. येणार्‍या कालावधीत या तालुक्यात परिवर्तनाची नांदी असेल, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. सनी यादव व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी पक्षकार्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी ढोल ताशाच्या गजरात आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या वेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. सनी यादव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply