Breaking News

पनवेलच्या सौंदर्यीकरणात पडणार भर

विविध विषयांना महासभेत मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या बुधवारी (दि. 20) झालेल्या महासभेत कळंबोली येथील सेक्टर 6मध्ये आयजीपीएल कंपनीच्या सीईआर फंडातून उभारण्यात येणारे उद्यान, सेक्टर 11मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय  सभागृह आणि पनवेल शहरातील लेंडाळे तलावाच्या सुशोभीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पनवेलच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.
पनवेल महापालिकेची महासभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी ऑनलाइन झाली. या सभेला सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती  संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती, आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त सांडभोर उपस्थित होते. या सभेत कळंबोली येथील सेक्टर 6 ई प्लॉट क्रमांक 2मध्ये आयजीपीएल कंपनीच्या सीईआर फंडातून दोन ते 2.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार्‍या उद्यानाला मंजुरी देण्यात आली. सेक्टर 11मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय सभागृह बांधण्यात येणार असल्याने कळंबोली परिसरातील नागरिकांना चांगले उद्यान आणि सभागृह उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पनवेल शहरात लेंडाळे तलावाच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे पनवेलच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे. पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या जुई गावात मलनि:सारण वाहिनी टाकणे, पंपिंग स्टेशन बांधणे व मलप्रक्रिया केंद्र उभारणे यासाठी सहा कोटी 52 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने या गावाला पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. मलनि:सारण वाहिनीमुळे गावात स्वच्छता राहून तेथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहणार असल्याने गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  
महापालिकेच्या कर्माचार्‍यांची 10 ते 20 हजार रुपयांची वैद्यकीय बिले मंजूर होण्यासाठी यापूर्वी अलिबागला पाठवावी लागत होती. यामध्ये वेळ जात असल्याने ही वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी गट अ (पनवेल महापालिका), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (नागरी आरोग्य केंद्र, पनवेल) आणि वैद्यकीय अधिकारी (उपजिल्हा रुग्णालय, पनवेल महापालिका) यांची कमिटी स्थापन करण्यास मंजुरी मिळाली. त्यामुळे आता वैद्यकीय बिले लवकर मिळतील.
पनवेल महापालिका क्षेत्रात वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने वीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार घडत असतात. महावितरणने टपाल नाका येथे 2019मध्ये नवीन उपकेंद्र उभारले आहे. त्या ठिकाणाहून नागपूरच्या धर्तीवर महावितरणने  3900 मीटर भूमिगत केबल टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे वीजवाहिन्यांची लांबी कमी होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार कमी होऊन शहरास दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होईल. यासाठी सिमेंट क्राँकिट रस्त्याच्या बाजूला असणार्‍या सर्व्हिस डक्टचा वापर केला जाणार आहे.
पनवेल शहरात तसेच ग्रामीण भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्याने व गंजल्याने त्या अपुर्‍या पडत असल्याने पाणीपुरवठ्यात अडचण येत  आहे. त्यांची सारखी दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागतो. तो थांबावा यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे व अस्तित्वात नसलेल्या ठिकाणी जलवाहिन्या टाकणे आणि त्या अनुषंगाने  येणारी कामे तातडीने करून घेण्यासाठी सहा कोटी 63 लाख 80 हजार 973 रुपये खर्च अंदाजित आहे. त्यासाठी ठेकेदार नेमण्यास महासभेत मंजुरी देण्यात आली.
भ्रष्टाचारावर प्रशासनाचा खुलासा
महापालिका कर्मचारी दौलत शिंदे व कंत्राटी सफाई कामगार विजय शिंदे (गोट्या) यांच्यावर मागील सभेत नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली होती. त्याबाबत कोणतीही माहिती आजची सभा सुरू झाली तरी प्रशासनाने सदस्यांना अथवा महापौरांना दिली नव्हती. इतिवृत्तावर चर्चा करताना नगरसेवक बावीस्कर यांनी दंड घेताना वरील पावतीवर दोन हजार रुपये आणि डुप्लिकेटवर 100 रुपये घेतले जात असून, अशा पावतीचे क्रमांक व तारीख सांगून माहिती दिली. त्यावर अनेक नगरसेवकांनी त्याबद्दल तक्रारी केल्याने महापौरांनी  प्रशासनाने काय कारवाई केली याची माहिती देईपर्यंत सभा स्थगित केली. प्रशासनाने दिलीगिरी व्यक्त करून कंत्राटी सफाई कामगार विजय शिंदे (गोट्या) याला ठेकेदाराने काढून टाकल्याचे व दौलत शिंदे यांचा खुलासा सामान्य प्रशासन विभागाकडे कारवाईसाठी पाठवल्याचे सांगितले.  
प्रभाग ‘क’मधील मंजूर विकासकामे
जुई गावात मलनि:सारण वाहिनी टाकणे, पंपिंग स्टेशन बांधणे व मलप्रक्रिया केंद्र उभारणे सहा कोटी 52 लाख नऊ हजार 617 रुपये, पनवेल शहर पटेल मोहल्ला येथील लेंडाळे तलाव सुधारणा करून सुशोभीकरण करणे तीन कोटी 10 लाख 98 हजार 605 रुपये.
प्रभाग ‘ड’मधील मंजूर विकासकामे
प्रभाग क्रमांक 19मधील मच्छी मार्केटमध्ये कोल्ड स्टोरेज बसविणे 82 लाख चार हजार 162 रुपये, मच्छी मार्केट पत्रे बदलणे व फॉल सीलिंग करणे 53 लाख 58 हजार 227 रुपये, उरण रोडवरील श्री संताजी महाराज जगनाडे चौक ते लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटपर्यंत आरसीसी नाला बांधणे एक कोटी 67 लाख 12 हजार 858 रुपये आणि डॉ. मौलाना आझाद चौक ते महापालिका अग्निशमन केंद्रापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे 35 लाख 84 हजार 578 रुपये.  
‘दिबां’च्या नावाचा ठराव शासन, सिडकोकडे सादर
महापालिकेच्या आजच्या सभेत पनवेलच्या विकासाच्या आणि सौंदर्यीकरणात भर टाकणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारी लक्षवेधी दिली होती. सभागृहाने 2018मध्येच त्याबाबत ठराव केलेला आहे. आजच्या सभेत प्रशासनाने हा ठराव शासनाकडे आणि सिडकोकडे पाठवल्याची माहिती दिली. प्रशासनाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची माहिती लेखी देण्याचे आदेश दिले असताना त्यांच्याकडे माहिती उपलब्ध असतानाही दिली गेली नव्हती. यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी सभा स्थगित केली, असे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले.

उरण नाक्यावरील मच्छी मार्केट हे पनवेलचे वैभव आहे. या ठिकाणी विविध प्रकारची व चांगल्या दर्जाची मासळी वाजवी दरात  मिळते. त्यामुळे अनेक खवय्ये लांबून येथे मच्छी खरेदी करण्यासाठी येतात. या ठिकाणी कोल्ड स्टोरेज नसल्याने विक्रेते थर्माकोल बॉक्समध्ये बर्फ टाकून त्यात मच्छी ठेवतात. उंदीर ते बॉक्स फोडतात व त्यामुळे थर्माकोलचे तुकडे गटारात पडल्याने गटारे तुंबून दुर्गंधी पसरते. तसे होऊ नये यासाठी तेथे कोल्ड स्टोरेज बांधल्यास स्वच्छ व निरोगी वातावरणात ठेवलेली मच्छी नागरिकांना उपलब्ध होईल.
-परेश ठाकूर, सभागृह नेते

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply