Breaking News

ठाकूर कुटुंब माझ्या विजयाचे शिल्पकार

खासदार श्रीरंग बारणे यांची कृतज्ञता

पनवेल : रामप्रहर वृत्त

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी बारणे परिवारापेक्षा ठाकूर कुटुंबीयांनी जास्त मेहनत घेतली. त्यामुळे तेच खर्‍या अर्थाने या विजयाचे शिल्पकार आहेत. त्याची परतफेड आम्ही करणार असून, येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर एक लाखाहून अधिक मतांची आघाडी घेऊन विजयी होतील, असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी (दि. 29) येथे व्यक्त केला. पनवेल भाजप, शिवसेना, मित्रपक्ष महायुतीच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बारणे यांचा जाहीर सत्कार पनवेल शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

खासदार बारणे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सर्वांचे आभार व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीय माझ्या विजयाचे शिल्पकार असल्याचे सांगितले. पनवेल मतदारसंघातून दिवसरात्र काम करून त्यांनी मला विजयी केले. हा विजय केवळ माझा नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे. माझे कार्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम युतीच्या कार्यकर्त्यांनी केले असे सांगताना राजकारणात दुसर्‍यासाठी कुणी काम करीत नसतो, पण ठाकूर परिवाराने या निवडणुकीत घरातील उमेदवार आहे असे समजून माझे काम केले. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कोणतीही अपेक्षा न ठेवता चार नाही, तर दहा पावले पुढे जाऊन काम केल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

या वेळी विरोधकांचा समाचार घेताना खासदार बारणे यांनी, शेकाप आता शेवटची घटका मोजत असून, उरलेसुरलेला पक्ष फक्त सेटलमेंट करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत विरोधांकडे पापाचा आणि शापाचा पैसा होता. अशा वेळी शेकापने राष्ट्रवादीचा पुरेपूर फायदा घेतला असल्याचा टोला लगावला. ते पुढे म्हणाले, विरोधकांच्या अगदी उलट लोकांच्या सेवेसाठी तत्पर असलेला ठाकूर परिवार कृतीतून काम करतो. मी अंदाज बांधला होता त्याहीपेक्षा जास्त मला पनवेल मतदारसंघात मताधिक्य मिळाले ते लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामुळे. राज्याच्या राजकारणात नेतृत्व करणारे पवार कुटुंब समोर उभे ठाकल्याने बारणेंचे काही खरे नाही अशी चर्चा घुमत होती, मात्र ठाकूरांच्या नेतृत्वाखाली येथील मतदारराजा ठाम राहिला. या निवडणुकीत पैसा चालला नाही, पवार घराण्याचे वलयही नापास झाले असे सांगून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात गल्लीपासून दिल्लीपर्यंत संपूर्ण देशभर कायम आहे. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकासकामामुळे विधानसभेला पनवेल मतदारसंघात विरोधक एक लाखाचाही आकडा गाठणार नाही, असा दावा त्यांनी केला. काम करताना रायगडने आपलेसे केले असून, या विभागात केंद्र सरकारच्या योजना राबविण्यासोबत विविध कामे करणार असल्याचे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर आणि युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, कोणताही गाजावाजा न करताना सरळ मार्गाने काम करीत जायचे ही मनी असलेली भावना आणि त्या अनुषंगाने आत्मविश्वास, दृढनिश्चय या मूल्यांतून खासदार श्रीरंग बारणे यांनी काम केले आहे. आपल्या कार्यातून त्यांनी पाच वेळा संसदरत्न सन्मान मिळविला. ज्याप्रमाणे ते काम करीत आहेत त्यावरून पाचवेळा खासदार झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करताना भाजप, शिवसेना मित्रपक्ष युती त्यासाठी साथ देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सर्व समाजाला न्याय देण्याचे काम केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. त्यामुळे सर्वांना युतीचीच सत्ता हवी आहे. मोदींच्या झंझावाताने बारामतीलाही चिंता लागली होती. मावळ लोकसभेत महाराष्ट्रातील विरोधकांनी गाजावाजा केला होता. तो फक्त गाजावाजाच होता. आत्मविश्वास आपल्याकडे होता. म्हणूनच प्रचंड मताधिक्यांनी आपला विजय झाला. पनवेल मतदारसंघात 30 ते 35 हजारांची आघाडी मिळेल असा अंदाज होता, पण युतीच्या कार्यकर्त्यांनी एकजीव होऊन अहोरात्र काम केले, त्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो. विधानसभेला कितीही पैसेवाला उभा राहिला तरी भाजप, शिवसेना, आरपीआय मित्रपक्ष युतीच्यासमोर तो टिकणार नाही, असा विश्वासही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. 

सिडकोे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आदर्श व कर्तव्यदक्ष खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांनी आपल्या कार्यातून ओळख निर्माण केली आहे. आपल्या हक्काचा माणूस म्हणून पुन्हा ते संसदेत गेले आहेत. त्यामुळे पनवेलचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांची आपल्याला मदत होणार आहे. संयमी व शांतपणे त्या-त्या विभागातील नेतृत्वावर विश्वास ठेवून राहिल्यामुळे सव्वादोन लाख मतांची आघाडी मिळाली असून, काम केल्याची पावती मिळाल्याने मनाला समाधान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.

केंद्राने विविध क्षेत्रांत पावले उचलली आणि यापुढेही सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून धडाडीचे निर्णय होणार आहेत. श्रीरंग बारणे यांना हरविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला बाहेरून लोकं आणावी लागली. दुसरीकडे भाजप, शिवसेना, आरपीआय युती संयमाने आणि एकसंध होऊन काम करीत राहिली. त्यामुळे आपला विजय सोपा झाला. पनवेलच्या यशाचा निश्चितच अभिमान आहे, पण चिंचवडने सर्वाधिक मतांची आघाडी दिली आहे, मात्र पुढच्या वेळी चिंचवडपेक्षा एक तरी मत जास्त मिळवून देऊ, असा निर्धार आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.

या सत्कार सोहळ्यास व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिरीष बुटाला, माधव भिडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपमहापौर विक्रांत पाटील, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, वासुदेव घरत, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, शहरप्रमुख अच्युत मनोरे, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विनोद साबळे, दीपक निकम, प्रल्हाद केणी, प्रथमेश सोमण, परेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या पाठीशी ठामपणे उभे रहा – लोकनेते रामशेठ ठाकूर

मावळ लोकसभा मतदारसंघात विविध प्रकल्प येत आहेत. औद्योगिकरण, शहरीकरण वाढत आहे. त्या अनुषंगाने निर्माण होणारे प्रश्न आणि गोरगरिबांची रेंगाळलेली कामे पूर्ण व्हावीत अशी आपली अपेक्षा असते, मात्र विरोधक चितावणी देऊन व आरडाओरड करून लोकांची दिशाभूल करीत असतात. त्याला न जुमानता विविध प्रश्न सोडविण्यासाठी आणि परिसराच्या विकासासाठी सत्ताधारी युती सरकारचे खासदार श्रीरंग बारणे व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

जनसेवेसाठी कायम सज्ज राहू -आमदार प्रशांत ठाकूर

सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार काम करीत आहे. काँग्रेसच्या काळात अनेक योजना कागदावरच राहिल्या, तर भाजप युती सरकारने लोकहिताच्या नवनवीन योजना राबवून देशाला बळ दिले. त्यामुळे हे सरकार माझासाठी काम करीत आहे, ही भावना लोकांच्या मनात रुजली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून वाढल्या आहेत. त्या निश्चितच आपण पूर्ण करू असे सांगतानाच लोकांची अधिकाधिक सेवा करण्यासाठी सज्ज राहू, अशी ग्वाही सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply