पनवेल ः वार्ताहर
पनवेलचे ग्रामदैवत श्री जाखमाता देवीची पालखी परिक्रमा सालाबादप्रमाणे यंदाही शनिवारी (दि. 1) मोठ्या उत्साहात ढोलताशाच्या गजरात निघाली. या सोहळ्यात भाविकांनी सहभाग घेतला. पनवेलकरांचे आराध्यदैवत देवीचे मूळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद इतिहासात सापडते. नागरिकांची या देवीवर अपार श्रद्धा आहे. या देवीचा दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. ढोलताशाच्या गजरात आणि नाचातगाजत संपूर्ण पनवेलमधून फिरून पहाटेपर्यंत देवळात पालखी आणण्याची प्रथा आहे. मोठ्या भक्तिभावाने अनेक वर्षांपासून हा पालखी सोहळा साजरा केला जातो. या वेळी नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ठिकठिकाणी जाखमातेचे माता-भगिनींनी स्वागत व औक्षण केले. यानिमित्ताने शहरातील अनेक सामाजिक मंडळांद्वारे पालखीत सहभागी होणार्या भाविकांसाठी पाणी व सरबताचे वाटप करण्यात आलेे. पालखी सोहळा झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.