Breaking News

विकास निधी खर्च करण्यात रायगड अव्वल

अलिबाग ः प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीमधील मंजूर वार्षिक निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा प्रशासनाने सलग दुसर्‍या वर्षी राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. रायगड जिल्ह्यासाठी सरत्या आर्थिक वर्षात 320 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत आपला 100 टक्के लक्ष्यांक पूर्ण केला. राज्य सरकारने 2022- 23 या आर्थिक वर्षासाठी रायगड जिल्ह्यासाठी 320 कोटी रुपायांच्या वार्षिक विकास आराखड्याला मंजुरी दिली होती. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये जिल्ह्याला संपूर्ण विकास निधी प्राप्त होत असतो. सर्व सोपस्कार पूर्ण करून ही कामे डिसेंबरपर्यंत मार्गी लागण्याची अपेक्षा असते. राज्यातील सत्तासंघर्षामुळे काही काळ विकासकामांना ब्रेक लागला होता, पण त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येत सामंजस्याची भूमिका घेतल्याने निधीचे योग्य वितरण करण्यात आले. शेवटच्या टप्प्यात सात दिवस कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रशासनाची मोठी कोंडी झाली होती. कर्मचारी संपावर असल्याने कार्यालयीन कामकाच ठप्प झाले होते. त्यामुळे विकासकामे मार्गी कशी लावायची हा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र संप मिटल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी वार्षिक विकास आराखड्यातील 100 टक्के निधी खर्च करून रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला होता. त्यामुळे या वर्षीही सर्व निधी विकासकामांवर खर्ची पडावा या दृष्टीने जिल्हाधिकारी आणि नियोजन विभागाने तयारी केली होती. सर्व विभाग प्रमुखांच्या वेळोवेळी बैठका घेऊन नियोजित कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही झाली आहे.

संपामुळे कामकाजाचे सात दिवस वाया गेले. तरीदेखील निधी विनियोगात रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. 31 मार्चपूर्वी निधी खर्ची टाकण्याच्या दृष्टीने सर्व विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्वच विभागांनी प्रयत्न केले. पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी झालो.

-जयसिंग मेहेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी

Check Also

अष्टपैलू गायिका आशा भोसले

आशा भोसले… सुरुवात कुठून करावी असा या व्यक्तिमत्वाची खोलवर ओळख करून देताना मला प्रश्न पडतोय …

Leave a Reply