Breaking News

खंडाळा घाटातील अपघातात 12 जणांचा मृत्यू

28 जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून तातडीने अपघातस्थळी पाहणी

खोपोली : प्रतिनिधी
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात शनिवारी (दि. 15) पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 28 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जण गोरेगाव, मुंबई येथील रहिवासी आहेत. अपघाताबाबत माहिती मिळताच तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी येऊन माहिती घेतली. त्याचप्रमाणे मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

गोरेगाव, मुंबई येथील बाजीप्रभू वादक ग्रुप पिंपरी पुणे येथे कार्यक्रमाकरिता शुक्रवारी गेला होता. जवळपास 45 ते 46 जण या ग्रुपमध्ये होते. शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथून परत मुंबईकडे जाण्यासाठी बस (क्र. एमएच 02 ईआर 8082)मधून निघाले होते. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून खोपोलीत उतरताना घाटात अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळली. या अपघातात बसचे अक्षरशः तुकडे झाले असून बसमधील 12 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, अपघातग्रस्त मदत पथक आयआरबी देवदूत पथक, बोरघाव वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस तातडीने घटनास्थळी मदत पोहचले. रोपच्या सहाय्याने दरीतून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी बचाव पथकाने प्रचंड मेहनत घेतली.

मृतांमध्ये जुई दिपक सावंत (वय 18, गोरेगाव, मुंबई),यश सुभाष यादव, विर कमलेश मांडवकर (वय 6), वैभवी साबळे (वय 15), स्वप्नील श्रीधर धुमाळ (वय 16), सतिश श्रीधर धुमाळ (वय 25), मनीष राठोड (वय 25), कृतिक लोहित (वय 16 गोरेगाव, मुंबई), राहुल गोठण वय 17, गोरेगाव मुंबई), हर्षदा परदेशी वय 19, माहीम, मुंबई), अभय विजय साबळे (वय 20 मालाड, मुंबई), एका मृताची ओळख पटलेली नाही.
तर जखमींमध्ये आशिष विजय गुरव (वय 19, दहिसर मुंबई), यश अनंत सकपाळ (वय 17, गोरेगाव, मुंबई), जयेश तुकाराम नरळकर (वय 24, कांदिवली, मुंबई), वृषभ रवींद्र कोरमे वय 14, गोरेगाव, मुंबई), रुचिका सुनील डुमणे (वय 17, गोरेगाव, मुंबई), आशिष विजय गुरव (वय 19, दहिसर, मुंबई), ओंकार जितेंद्र पवार (वय 25 खोपोली, रायगड), संकेत चौधरी वय 40, गोरेगाव, मुंबई), रोशन शेलार (वय 35, मुंबई), विशाल अशोक विश्वकर्मा (वय 23, गोरेगाव, मुंबई), निखिल संजय पारकर वय 18 मुंबइ), युसुफ मुनीर खान (वय 13, मुंबई), कोमल बाळकृष्ण चिले (वय 15, सांताक्रुज, मुंबई), अभिजीत दत्तात्रेय जोशी (वय 20, गोरेगाव मुंबई), मोहक दिलीप सालप (वय 18, मुंबई), दिपक विश्वकर्मा वय 20, गोरेगाव मुंबई), सुरेश बाळाराम अरोमुक्कंम (वय 18, गोरेगाव, मुंबई), नम्रत रघुनाथ गावनुक (वय 18, गोरेगाव, मुंबई), चंद्रकांत महादेव गुडेकर वय 29, गोरेगाव, मुंबई), तुषार चंद्रकांत गावडे, (वय 22, गोरेगाव, मुंबई), हर्ष अर्जुन फाळके (वय 19, विरार), महेश हिरामण म्हात्रे (वय 20, गोरेगाव, मुंबई), लवकुश रणजीत कुमार प्रजापति (वय 16, गोरेगाव, मुंबई), शुभम सुभाष गुडेकर (वय 22, गोरेगाव, मुंबई), ओम मनीष कदम (वय 18, गोरेगाव, मुंबई), मुसेफ मोईन खान (वय 21, गोरेगाव, मुंबई) व सनी ओमप्रकाश राघव (वय 21, खोपोली, रायगड) यांचा समावेश असून त्यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालय, खोपोली नगरपालिका रुग्णालय व जाकोटिया रुग्णालय खोपोली येथे उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटूंबिंयाप्रती सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अपघातातील जखमींची विचारपूस व प्राथमिक मदत पुरविण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात भेट दिली.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply