Breaking News

तरुणाईची शेतीकामांकडे ओढ

लागवडीखालील क्षेत्र वाढणार

रोहे ः प्रतिनिधी
रोहा तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने भात लावणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात शेतकर्‍यांची लावणीच्या कामाची लगबग सुरू असून या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता
कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. रोहा तालुक्यात गेल्या वर्षीपेक्षा लागवडीचे क्षेत्र यंदा 500 ते 800 हेक्टर वाढणार आहे.
रोह्यात 10,800 हेक्टर लागवड क्षेत्र आहे, परंतु तरुणांच्या शेतीप्रति उदासीनतेमुळे शेतीचे लागवड क्षेत्र कमी होत चालले आहे. कृषी विभागाने याबाबत सातत्याने जनजागृती केल्यामुळे आता तरुण शेतीकडे वळून शेतीत लक्ष घालत आहेत. तरीही गेल्या वर्षी लागवडीचे क्षेत्र कमी होऊन 9500 हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा मुंबईकर आपल्या गावी आल्याने आपल्या पडिक जमिनीवर लागवड करीत असल्याने या वर्षी भात लागवडीचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. यंदा अंदाजे 500 ते 800 हेक्टरपर्यंत लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी अधिकारी महादेव करे यांनी वर्तविली आहे. त्यामुळे या वर्षी 10,000 हेक्टर अथवा त्यापुढील क्षेत्र लागवडीखाली येण्याची शक्यता आहे.
रोहा तालुक्यात सर्वत्र भात लावणीच्या कामाची लागबग सुरू असून 50 टक्क्यांच्या आसपास लावणीचे काम झाले आहे. या वर्षी शेतकर्‍यांनी जया, रत्ना, कर्जत, कर्जत 7, कर्जत 9, जोरदार, कोमल रूपाली जातीच्या बियांणाची लागवड केली आहे. काही भागांत नाचणीचे पीक घेतले जाते. या वर्षी 500 हेक्टरमध्ये हे पीक घेतले जाण्याची शक्यता आहे. भात, नाचणीनंतर रोह्यातील शेतकर्‍यांनी बांधावर
तूर, भेंडीची लागवड केली आहे. चणेरा भागात सफेद घेवड्याचे पीक घेतले आहे. काही भागात कमी प्रमाणात का होईना पण भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply