पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एमकेसीएल अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित रायगड विभाग यांच्या सहकार्याने दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरारी 2023-तुमच्या करिअरला द्या एक परिपूर्ण भरारी या आशयाखाली करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी (दि. 7) सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 वाजता हे शिबिर होणार आहे.
दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकरिता पनवेल तालुक्यातील सर्व एमएस-सीआयटी केंद्रांच्या माध्यमातून विनाशुल्क हे शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिरात नामवंत व्याखाते, लेखक व करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी विविध वर्तमानपत्रांतून करिअर विषयावर 500हून अधिक लेख लिहिले आहेत तसेच करियर पाथ फाईनडर या सुप्रसिद्ध करियर तक्त्याचे लेखन केले आहे. आतापर्यंत राज्यभर 2500हून अधिक करिअर व्याख्याने देणार्या मार्गदर्शकाचे बहुमूल्य मार्गदर्शन या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
एमकेसीएलचे डेप्युटी जनरल मॅनेजर दीपक पाटेकर हे प्रत्यक्ष कार्यानुभवातून पदवी कशी मिळवावी या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. बीबीएपासून ते बीएस्सी कम्प्युटर सायन्स या पदव्यादेखील आपण काम करता-करता कशा मिळवू शकतो या संदर्भात कमवा आणि शिका तसेच एमकेसीएलचे जॉब स्कील कोर्सेस (क्लिक कोर्स) याबद्दल आपल्याला माहिती कळू शकेल.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर मोफत मार्गदर्शन करण्याचे काम एमकेसीएलच्या रायगड जिल्ह्यातील सर्व एमएस-सीआयटी आणि क्लिक सेंटरच्या माध्यमातून होत आहे. या शैक्षणिक मेजवानीचा दहावी, बारावी तसेच महाविद्यालयीन सर्व विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एमएस-सीआयटी आणि क्लिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …