खोपोली : प्रतिनिधी
सन 2014 ते 2023 या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या. या जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार आणि प्रसार करावा, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) खोपोली येथे केले.
मोदी ऽ 9 कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पक्ष महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने कर्जत विधानसभा क्षेत्र संयुक्त मोर्चा संमेलन खोपोलीतील कमलाबेन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून आमदार ठाकूर बोलत होते. या संमेलनास भाजप विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा आयोजक अश्विनी पाटील, विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश मस्कर, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, पनवेलचे माजी नगरसेवक तथा अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष प्रकाश बिनेदार, खोपोली महिला मोर्चा अध्यक्ष शोभा काटे यांच्यासह कर्जत, खालापूर, खोपोली येथील विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रात भाजप सरकार येण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला होता. शंभरपैकी पंधराच टक्के लाभार्थींच्या हातात पडत असे विधान तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी केल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाषणात सांगून म्हटले की, पंतप्रधान मोदींनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारास आळा बसला. नोटाबंदी केल्यामुळे देशातील गैरप्रकार बंद झाले. पंतप्रधान मोदींनी स्वतःला जनसेवक मानले. म्हणून संसदेत प्रथमतः प्रवेश करताना त्यांनी इमारतीच्या पायरीवर नतमस्तक होऊन अभिवादन केले होते. पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे कुटुंब त्यांच्यापासून दूर होते. यावरूनच नरेंद्र मोदी यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित केल्याचे दिसून येते, असे सांगितले.
कोरोना काळात लस भारतात तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. आपल्या देशालाच नव्हे तर अन्य देशांनाही त्यांनी कोविड लस पुरवल्यामुळे लाखोंचे प्राण वाचले. या महामारीच्या काळात अनेकांचा रोजगार बुडाला. म्हणून सर्वसामान्यांसाठी मोफत धान्य पुरविण्यात आले. देश-विदेशात भारताचे नाव उज्ज्वल करण्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती घरोघरी पोहचवण्याची जबाबदारी घ्यावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केले.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील व चिटणीस गोपाळ बावस्कर यांनी केले. पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात संमेलन आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. या वेळी विस्तारक अविनाश कोळी व माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी या अभियानाची विस्तृतपणे माहिती देऊन कार्यकर्त्यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
संमेलनाचे सूत्रसंचालन युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शहराध्यक्ष रमेश रेटरेकर यांनी मानले. या संमेलनाला कर्जत व खालापूर तालुक्यातील विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
कुष्ठपीडितांच्या मी नेहमी पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या समाजाला पद्मश्री राम नाईक यांच्यासारखे एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे. …