Breaking News

कर्नाळा बँक घोटाळा : अभिजीत पाटलांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानेही फेटाळला

पनवेल : प्रतिनिधी
शेकाप नेते, माजी आमदार, कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांचे चिरंजीव व बँकेचे संचालक अभिजीत पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. 30) फेटाळला. या वेळी उच्च न्यायालयात शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता अभिजीत पाटील यांना केव्हाही अटक होऊ शकते. त्यामुळे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेल्या संचालकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्नाळा बँकेचे संचालक अभिजीत विवेकानंद पाटील यांचा बँक गैरव्यवहारप्रकरणी सक्रिय सहभाग दिसून येत असल्याने पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी 9 जून रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अभिजीत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयात न्या. अमित बोरकर यांच्यासमोर शुक्रवारी त्या अर्जावर सुनावणी झाली. या वेळी अभिजीत पाटील यांची बाजू अ‍ॅड. राहुल ठाकूऱ यांनी मांडली. सरकारतर्फे अ‍ॅड. अमित पालरेचा यांनी अभिजीत पाटील यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला.
अध्यक्ष विवेक पाटील यांनी कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. तसे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे बँकेच्या गैरव्यवहाराशी अभिजीत पाटील यांचा संबंध नाही. म्हणून त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद अ‍ॅड. राहुल ठाकूऱ यांनी न्यायालयासमोर केला, मात्र सहकारी बँकेच्या व्यवहाराला सर्व संचालक मंडळ जबाबदार असते. त्यामुळे अभिजीत पाटील यांची जबाबदारी नाकारता येत नाही, असे उच्च न्यायालयाचे न्या. अमित बोरकर यांनी स्पष्ट केले आणि त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

अभिजीत पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळून हायकोर्टानेही कर्नाळा बँक घोटाळ्यात सर्वसामान्य ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाची दखल घेतली आहे. दोन वर्षे जेलमध्ये असलेल्या विवेक पाटील यांचा त्यांच्या वाढदिवसाला बॅनर लावून उदो उदो करणार्‍यांनी आता अभिजीत पाटलांचा कर्नाळा बँक घोटाळ्याशी संबंध नाही, हेही जाहीर करून टाकावे.
-आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष, कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply