Breaking News

कर्नाळा बँक बुडविणार्‍या विवेक पाटीलांकडून ‘शेकाप’चा राजीनामा

तब्येतीचे कारण देत सक्रिय राजकारणातून निवृत्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँक बुडविणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील मागील दोन वर्षांपासून तळोजा कारागृहात असून त्यांनी कारागृहातून पत्र जाहीर केले असून त्यामध्ये आजारपणाला कंटाळून शेकापच्या सक्रिय राजकारणातून राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाटील यांचे राजीनामा पत्र गुरुवार सकाळपासून समाजमाध्यमांवर पसरल्याने पनवेलमध्ये राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी हे राजीनामा पत्र खरे असल्याचे सांगत कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकार्‍यांसाठी दुदैवी बाब असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे दुसर्‍या बाजूला अशा प्रकारचे पत्र व्हायरल करून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी त्यांचा पत्ता ‘एमबी 387, सर्कल हॅास्पिटल, तळोजा मध्यवर्ती कारागृह, खारघर, नवी मुंबई’, हा दिला आहे. तसेच पत्राची तारीख आहे 12 जुलै 2023. या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, मी शेकापचा 1979पासून सक्रिय कार्यकर्ता आहे. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मला दोन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून दिले. गेली दहा वर्ष पनवेल पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली, तसेच 1995, 1999, 2004, 2009 असे चार वेळा विधानसभेवर निवडून दिले होते. 20 वर्षे आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या सर्व कार्यकर्त्यांचे हितचिंतकांचे त्यांनी आभार मानत आहे.
पुढे या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, तुम्हाला माहीतच आहे गेल्या 4 वर्षांपूर्वी एका जीवघेण्या आजारातून मी बरा झालो. आता पुन्हा त्याच आजाराने त्रस्त आहे. शारीरिक व्याधीमुळे मला यापुढे काम करणे शक्य होणार नाही, म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत असून शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा देत आहे.
चार वर्षांपूर्वी विवेक पाटील यांच्यावर ते अध्यक्ष असलेल्या कर्नाळा बँकेत त्यांनी 548 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उघड केला होता.
विवेक पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र आणि बँकेच्या इतर संचालकांवर कारवाई सुरू असताना विवेक पाटील यांनी शेकापमधून राजीनामा दिल्याची घोषणा केल्याने पनवेल व उरण परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्नाळा बँकेचे प्रकरण उजेडात आणून विवेक पाटील यांच्यावर कारवाई करण्यास सीआयडी आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) विभागांना भाग पाडले होते. यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी ईडी कार्यालयात पाठपुरावा केला होता.

विवेक पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे पत्र सामाजिक माध्यमांवरती फिरत आहे. खरंतर विवेक पाटलांनी केलेल्या प्रतापामुळे जनतेने त्यांना निवृत्त करायचा निर्णय 2014 सालीच घेतला. प्रकृतीचे कारण विवेक पाटलांनी दिले आहे. मी त्यांची प्रकृती चांगली रहावी, यासाठी सदिच्छा देतो कारण, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची फळे त्यांनीच भोगली पाहिजेत. ज्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात हजारो ठेवीदारांचा विवेक पाटलांनी बळी द्यायचा प्रयत्न केला त्या भ्रष्टाचाराची शिक्षा त्यांनी भोगायलाच हवी. यासाठी तरी परमेश्वराने त्यांना चांगली प्रकृती द्यावी ही सदिच्छा.
– आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष भाजप, रायगड जिल्हा

माजी आमदार व शेकापक्षाचे नेते विवेकानंद पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे पत्र सामाजिक माध्यमांवर फिरत आहे ते खरे आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना आपला राजीनामा परत घेण्यासाठी विनंती करणार आहोत. आम्हाला खात्री आहे ते आपला राजीनामा मागे घेऊन राजकारणातून निवृत्ती घेणार नाहीत.
– गणेश कडू, सरचिटणीस, पनवेल शेकाप

माजी आमदार व शेकापक्षाचे नेते विवेकानंद पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे पत्र आमच्याकडे आले आहे.
–  आस्वाद पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply