ताम्र धातूवरील आकर्षक मिनाकारी व शिल्पकला भारतात शेकडो वर्षांपासून आहे. आधुनिकतेच्या काळात ही कला लोप होण्याच्या मार्गावर असताना अलिबाग तालुक्यातील भायमळा या गावात संजय पाटील व त्यांचा मुलगा विक्रांत पाटील हे पिता-पुत्र ही प्राचीन कला जोपासण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे देशी-परदेशी नागरिक येथे येऊन ही कला जाणून घेत आहेत.
या कलेला इंग्रजीमध्ये कॉपर एनॅमल आर्र्ट्स अॅण्ड क्राफ्टस् असे म्हणतात. अलिबाग कार्लेखिंडीत वसलेले भायमळा गाव अनेकांना अपरिचित आहे. काही वर्षांपूर्वी येथे हे काम करणारे तीन-चार कलाकार होते. विक्रांत व संजय पाटील हे अजूनही या व्यवसायात टिकून आहेत. याबरोबरच कॉपर एनॅमल आर्ट्स अॅण्ड क्राफ्टस् हे पेज इन्स्टाग्रामवर तयार करून याबाबत माहिती पोहचवत आहेत.
ताम्रपटावर चित्र रेखाटून त्यावर नेत्रदीपक मिनाकारी (वैशिष्ट्यपूर्ण रंग भरणे) कलाकृती निर्माण करणे, तांब्याच्या पत्र्यावर विविध आकार व चित्र आकर्षक रंगाने रंगवून कलाकृती तयार करण्याची कार्यशाळा संजय व विक्रांत आपल्या घराजवळ चालवित आहेत. हे अतिशय मेहनत, परिश्रम, जिद्द, चिकाटी, अनेक तास-दिवस खर्ची टाकून करावयाचे काम ते अतिशय आत्मियतेने करतात.
विक्रांतचे वडील संजय पाटील गेली 47 वर्षे ही कला टिकावी याकरिता हा व्यवसाय करीत आहेत. अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले. सध्या तांब्याची वाढलेली किंमत ही एक मोठी समस्या जाणवत आहे. मुंबईमधील काही संस्था व व्यावसायिक या कामात साथ देत आहेत. विशेष म्हणजे तरुण मुलेमुली या कलेत रस घेत आहेत. काही तरुण भायमळा येथे 8-15 दिवस राहून आपली कलाकृती पूर्ण करतात.
- अप्रतिम कलाकृती
या कार्यशाळेत दोन सेंमी ते 12 फूटपर्यंत विविध आकाराचे चित्र/शिल्प तयार होते. काही घरातील वॉल पीस, दरवाजा, झुंबर, वॉल लँप, टेबल लँप अशा विविध कलाकृती तयार केल्या जात आहेत. एका ताम्र चित्र किंवा ताम्र शिल्पसाठी काही तास ते काही दिवस किंवा महिनेसुद्धा वेळ द्यावा लागतो, तेव्हा मनासारखे शिल्प तयार होते. - सर्वोत्तम कलाकृती
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला 8द12 फूट भारताचा नकाशा यामध्ये स्थळ वैशिष्ट्यांसह सर्व राज्य दर्शविणारे शिल्प हे आपल्या आजवरच्या निर्मितीमधील उच्चतम शिल्प असल्याचे विक्रांतचे वडील संजय पाटील यांनी सांगितले. - कला टिकविण्यासाठी धडपड
मुघल काळापासून राजवैभव असलेली ही ताम्रपटावरील चित्रकला व शिल्पकला टिकावी याकरिता तरुण कलाकार विक्रांत संजय पाटील मनापासून काम करीत आहे. या आगळ्यावेगळ्या छंदाला आणि कलेवरील प्रेमाला अनेक दाद देतात.
-धम्मशील सावंत