पनवेल : रामप्रहर वृत्त
आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती आपल्या मनात जागत राहिल्या पाहिजेत, ज्या मातीतून आपण जन्माला आलो ती माती आपल्याला वंदनीय असली पाहिजे यासाठी माझी माती माझा देश हे अभियान राबविण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान महापालिका करतेय यातून देशापुढे, तरुण पिढीच्या पुढे बालपिढीसमोर मोठा संदेश दिला जातोय, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 11) येथे केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपानिमित्ताने संपूर्ण देशभरात माझी माती, माझा देश अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी पनवेल महापालिकेच्या वतीने लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयात स्वातंत्र्यसैनिक आणि शहीद वीरांचा नामोल्लेख असलेल्या शिलाफलकाचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत झाले तसेच ध्वजारोहण, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि पंच प्राण प्रतिज्ञा घेण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाचे औचित्य साधून वसुधा वंदन अर्थात 75 देशी वृक्षांचे रोपण करून कळंबोली येथे अमृत वाटिका निर्माण करण्यात आली आहे. याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर वीरांना वंदन या कार्यक्रमांतर्गत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शहीद वीर जवान आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, अभिषेक पराडकर सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंचप्राण शपथेमधील पाचही मुद्द्यांचे सविस्तर विवेचन करून प्रतिज्ञेचे महत्त्व उपस्थितांना स्पष्ट करून सांगितले.
आयुक्त गणेश देशमुख म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेत असतानाच ज्यांच्यामुळे आपणाला स्वातंत्र मिळाले ते स्वातंत्र सैनिक कोण होते, स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या शहरातील सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांची माहिती व्हावी या उद्देशाने शासन निर्देशानुसार स्वातंत्र्यैनिक आणि शहीद वीरांचा नामोल्लेख असणारा शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. या अभियानांतर्गत 15 आणि 16 ऑगस्टला माती कलश महापालिका क्षेत्रातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांना सन्मानित करण्यासाठी फुलांनी सजवलेल्या गाडीतून सन्मानपूर्वक आणणयात आले. अत्यंत भारावलेल्या वातावरणात पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील शहीद सैनिक विष्णू कदम यांच्या पत्नीचा तसेच 26 स्वातंत्रसैनिकांच्या नातेवाईकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी अथर्व मीडिया वर्ल्ड यांच्या सहयोगातून राहुल सोनावणे व त्यांच्या सहकार्यांनी शहीद वीरांना वंदन करीत देशभक्तीपर गीते सादर केली.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …